शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर शहरात गेली सव्वाशे वर्षापासून जातीय सलोखा, भाईचारा व एकीची परंपरा अबाधित असून हीच परंपरा येथून पुढेही कायम राखण्याचा निर्धार शांतता समितीच्या बैठकीत शिरूरकरांनी केला.शहराची शांतता भंग होणार नाही.याची दक्षता घेण्याचे मनसेचे आश्वासन.
रमजान ईद,अक्षय तृतीया या सणांबरोबरच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन मे ला मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा दिलेला अल्टिमेटम या पार्श्वभूमीवर शिरुर पोलीस ठाण्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित बहुतांशी मान्यवरांनी शहरात जातीय सलोखा व भाईचारा कायम राखण्याचा निर्धार केला.गवारी म्हणाले,सलोखा राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असून पोलिसांना जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.शिरूरच्या जातीय सलोख्याचा प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या कार्यकालात अनुभव येतो.सध्या शिरुर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनाही त्याचा अनुभव आला असून त्यांनीही जातीय सलोखा राखणारे शहर म्हणून शिरुरची ओळख असल्याचे आपल्या भाषणात स्पष्ट केले.मशीद असो चर्च असो वा मंदिर शहरातील ज्या प्रार्थना स्थळांवर भोंगे आहेत त्यांना परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आतापर्यंत सात पैकी सहा मशीद तर सहा मंदिर प्रशासनाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.भोंग्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे अंमलबजावणी केली जाणार असून या गाईडलाईन प्रमाणे तसेच परवानगी न घेता भोंग्याचा वापर केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
एकमेकाचा आदर तसेच सहिष्णुता राखणे हा शिरूरच्या मातीचा नैसर्गिक गुणधर्म असून शेकडो वर्षांपासून या शहराने सर्वधर्म समभाव व एकोप्याची नाळ भक्कम केली आहे.यामुळे या शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण यांनी दिली. शहरात सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये अतिशय खेळीमेळीचे वातावरण असून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकीच्या भावनेतून येथील लोक नांदताहेत.याला तडा जाणार नाही असा विश्वास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे यांनी यावेळी व्यक्त केला. जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर म्हणाले,जाती-धर्माच्या गलिच्छ राजकारणापासून शिरुरकर नेहमीच दूर राहिले असून संत व महामानवांनी दिलेल्या एकी व सलोख्याच्या शिकवनिशी ते कायम बांधील राहिले आहेत.’भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा नेते विसरले की काय अशी सध्याची परिस्थिती आहे.मात्र कोणत्याही धर्माला हिन न लेखता जातीय सलोखा काय असतो याचा एक आदर्श निर्माण केलेल्या शिरूरकराच्या वतीने एकीचा संदेश तीन मे ला साऱ्या देशाला देऊयात असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक विनोद भालेराव यांनी केले.
स्वतःच्या अस्तित्वासाठी व फायद्यासाठी नेतेमंडळी तरुणांचा वापर करीत असतात.मात्र योग्य काय,अयोग्य काय याचा विचार करून तरुणांनी आपली दिशा ठरवली पाहिजे.असे मत आम्ही शिरुरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्रबापू सानप यांनी व्यक्त केले. शहराच्या एकीला तडा जाईल तसेच वातावरण बिघडेल असे कोणतेही कृत्य कोणी करू नये असे आवाहन यावेळी त्यांनी केले.मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे यांनी शहरात शांतता भंग होणार नाही. याची दक्षता घेऊ असे आश्वासन दिले.मराठा सेवासंघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे,माजी नगरसेवक रवींद्र धनक,शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले,आम आदमी पक्षाचे शहर समन्वयक सुभाष जैन,शहराध्यक्ष अनिल डांगे,भाजपाचे शहर सरचिटणीस विजय नरके, भाजपा युवा आघाडीचे शहराध्यक्ष उमेश शेळके यांनीही बैठकीत आपले विचार मांडले.मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, माजी नगराध्यक्ष नसीम खान,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, युवक शहराध्यक्ष अमजद पठाण,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रवींद्र खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया,संतोष शितोळे,माजी उपसभापती अविनाश मल्लाव, समता परिषदेचे किरण बनकर,फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष रामा झेंडे,माजी नगरसेवक आबिद शेख,सागर सातारकर,किरण पठारे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे,कार्याध्यक्ष हाफिज बागवान,माजी शहराध्यक्ष निलेश पवार,सागर पांढरकामे,सागर नरवडे, कलीम सय्यद,राहील शेख,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिजाऊ दुर्गे,भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या रेश्मा शेख,मनसेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा डॉ.वैशाली साखरे,शहराध्यक्ष शारदा भुजबळ,आपचे समन्वयक सुभाष जैन,डॉ.नितीन पवार,शहराध्यक्ष अनिल डांगे आदी यावेळी उपस्थित होते.राजू गोपाळे यांनी स्वागत केले,सहाय्यक निरीक्षक पवार यांनी आभार मानले.