शिरूर: कामावर जायला उशिर झाईला….. बघतोय रिक्षावाला अन् वाट माझी बघतोय रिक्षावाला….. हे गाणे सर्वांनाच परिचित असेल. लॉकडाऊनमुळे मात्र रिक्षावाला कोणा ग्राहकाची नव्हे तर मदतीची वाट बघतोय असे चित्र आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून गेली ६८ दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. चौथा लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने कन्टेन्मेंट झोन वगळता काही बंधने घालून अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न केला. यामुळे कारखाने तसेच विविध व्यवसाय सुरू झाले. मात्र ग्राहकांअभावी रिक्षावाल्यांचा व्यवसाय मात्र सुरू होऊ शकला नाही. प्रवासी, कामगार, मजूर हेच रिक्षावाल्यांचा ग्राहकवर्ग आहे.सरकारने स्थानिक पातळीवर एसटी ची सेवा सुरू करण्यास परवानगी दिली.मात्र शिरुरमध्ये प्रवाशांअभावी एसटी बसेसची चाके फिरली नाहीत. कारखान्यांना परवानगी मिळाली. मात्र मोठ्या प्रमाणावर राज्य तसेच परराज्यातील कामगार आपापल्या घरी परतल्याने रांजणगांव एमआयडीसीतील कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले. परिणामी रिक्षाावाल्यांचे व्यवसाय सुरू होऊ शकले नाहीत.शहरात रामलिंग, संघर्ष, शिवनेरी, जनसेवा, रिक्षा पंचायत आदि रिक्षा संघटनांचे मिळून जवळपास अडीचशे रिक्षा आहेत.