बाबुरावनगरमधील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

शिरूर ग्रामीण ग्रामपंचायततीने अतिक्रमणे हटवली

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:बाबुरावनगर येथील रहदारीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने आज काढण्यात आली.अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी सांगितले.

बाबुराव नगर येथील विघ्नहर्ता रुग्णालय ते शिवलीला गार्डन या पट्ट्यात तसेच श्री गणेशा रुग्णालयासमोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकानासमोर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होती.या संदर्भात ग्रामपंचायतीकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद होऊन अपघाताच्या शक्यता बळवल्या होत्या.रामलिंग येथील दत्तात्रय घावटे दाम्पत्याला असाच एक वाईट अनुभव आला.याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती.सर्व तक्रारींची ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ ॲक्शन घेतली. ग्रामपंचायतीनेआज सकाळी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली.यासाठी ग्रामपंचायतीच्या विविध विभागाचे ३२ कर्मचारी,दोन जेसीबी,दोन ट्रॅक्टर तसेच तीन घंटागाडी असा ताफा यासाठी तैनात करण्यात आला.सरपंच शिल्पा गायकवाड,उपसरपंच बाबाजी वर्पे,माजी सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे,सदस्य संजय शिंदे,सचिन घावटे,मोनिका जाधव,सोनाली घावटे, ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी आदी यावेळी जातीने उपस्थित होते.

अतिक्रमण हटवण्यापूर्वी १५ दिवस अगोदर संबंधितांना नोटीस देण्यात आली.बहुतांशी जणांनी शक्य तेवढे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला.जे शक्य नव्हते ते अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांनी ग्रामपंचायतला सहकार्य केल्याचे तसेच अतिक्रमण काढताना कोणावरही अन्याय करण्यात आला नाही.असे उपसरपंच वर्पे यांनी सांगितले.अतिक्रमणे पुन्हा होऊ नये म्हणून या जागेवर वृक्षारोपण ( दहा फुटांची रोपे) करण्यात येणार असल्याचेही वर्पे यांनी सांगितले.चंदन चौकात संध्याकाळी भाजीबाजार भरल्यानंतर तेथून वाहने जाणेही कठीण झाले आहे.यामुळे या ठिकाणच्या बाजाराचे शिवलीला गार्डन जवळील ओपन स्पेसमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याचे सरपंच शिल्पा गायकवाड यांनी सांगितले.बगाड रस्त्यावरीलही अतिक्रमणे काढण्यात असल्याचे तसेच अतिक्रमणे काढण्यात आल्याने बाबुराव नगरमधील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे माजी सरपंच विठ्ठल घावटे यांनी सांगितले

.

Leave A Reply

Your email address will not be published.