औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना त्रास देणार्‍यांवर कडक कारवाई करणार-पोलीस अधीक्षक देशमुख

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना त्रास देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला.असा कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार द्या असे आवाहनही देशमुख यांनी उद्योगांना केले.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर देशमुख यांनी दिलखुलासपणे आपली भूमिका विशद केली.

          रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक केली. यासंदर्भात बोलताना अधीक्षक देशमुख यांनी उपरोक्त इशारा दिला. देशमुख म्हणाले औद्योगिक परिसरामध्ये उद्योगांना त्रास देण्याचे प्रकार घडतात.विविध प्रकारची कामे मिळविण्यासाठी कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना धमकावणे, माथाडीच्या माध्यमातून खंडणी गोळा करणे तसेच लेबर कंत्राटदारांकडून हप्ते गोळा करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारे त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात निर्भयपणे पोलिसात तक्रार द्यावी असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत विचारलेल्या प्रश्नावर देशमुख म्हणाले,लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. कामगारांची संख्या पूर्ववत झाली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये दर महिन्याला तर पोलीस अधीक्षक स्तरावर तीन महिन्याला बैठक आयोजित करण्यात येते.कामावरून सुटलेल्या परप्रांतीय कामगारांना लुटण्याचे प्रकार घडतात. असे प्रकार घडू नये म्हणून रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनला औद्योगिक परिसरात सी एस आर निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात सूचना करण्यात  आल्या आहेत.याबरोबरच कारखान्यांच्या शिफ्टच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवली जाणार आहे.
         देशमुख म्हणाले,गणेशोत्सव काळामध्ये गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.अशाच प्रकारे आगामी सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांकडून कोरोना नियमाची नियमाच्या अंमलबजावणीची अपेक्षा आहे.लसीकरणाचा वेग चांगला आहे.मात्र नागरिकांनी नियमही पाळणे गरजेचे आहे.नागरिकांनी या आवाहनास प्रतिसाद दिल्यास तिसरी लाट येण्याचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे पुन्हा लॉकडाउन करण्याची गरजही भासणार नाही. ग्रामसुरक्षा दल जिल्ह्यात फारसे ॲक्टिव्ह नाही. याबाबत देशमुख यांना अवगत केले असता,कोविड मुळे बऱ्याच गोष्टींवर फोकस करता आला नाही.आता मात्र ग्रामसुरक्षा दल जिल्ह्यात कार्यान्वित करण्यास प्राधान्य देऊ असे सूतोवाच देशमुख यांनी यावेळी केले. शिरूर पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या रस्ता सुरक्षा समिती च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.