शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: दाणेवाडी (ता.श्रीगोंदा,अहिल्यानगर) येथील निर्घृण खून प्रकरणात एक विचित्र गोष्ट अनुभवायास मिळाली ती म्हणजे आरोपी हाच खून झालेल्या युवकाच्या घरी जाऊन सापडले का आरोपी?अशी विचारणा करायचा. दुसरीकडे दुसऱ्या आरोपीचे वडील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. असे मीडिया समोर मत व्यक्त करायचे.
६ मार्च रोजी दाणेवाडी येथे माऊली गव्हाणे या युवकाचा खून करून त्याचे धड,दोन हात व पाय कटरच्या साह्याने तोडून विहिरीमध्ये फेकण्यात आले होते. या निर्घृण खुनाचा शोध लावण्याचे मोठे आव्हान अहिल्यानगर पोलिसांसमोर होते. या खुनासंदर्भात विविध तर्क लढवले जात होते.या खुनाचा छडा कधी लागेल याची उत्सुकता शिरूरसह श्रीगोंदा तालुक्याला देखील होती.सहा मार्चला रात्री साडे अकरा वाजता माऊली घराबाहेर गेला होता.यानंतर तो मिळून न आल्याने घरचे चिंतीत होते.दरम्यान आठ तारखेला माऊली त्याच्या चुलत बहिणीला शिरूर येथील चां ता बोरा महाविद्यालयाजवळ दिसल्याचे तिने कुटुंबाला सांगितले होते.यानुसार माऊली यांच्या कुटुंबाने शिरूर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती.(तपासात माऊली महाविद्यालयाजवळ दिसल्याचे निष्पन्न झाले नाही.)यानंतर १२ मार्चला दाणेवाडी येथील एका विहिरीमध्ये एक शीर दोन हात व एक पाय नसलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह आपल्या मुलाचा तर नाही या शंकेने माऊली याचे कुटुंबीय,नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून हा मृतदेह कोणाचा?तसेच माऊलीच्या हरवल्याच्या तक्रारीवर काय ॲक्शन घेतली याबाबत विचारणा केली होती. यावेळी शिरूर पोलिसांनी २४ तासात तक्रारी संदर्भात तपास करू असे आश्वासन दिले होते.शरीराचे तुकडे केलेला मृतदेह सापडल्यावर श्रीगोंदा तसेच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपासासंदर्भात ॲक्टिव्ह झाला होता.माऊली गायब झाला. यानंतर एका विहिरीत शिर, दोन हात एक पाय नसलेला मृतदेह सापडल्यापासून माऊलीचे नातेवाईक तसेच गावातील ग्रामस्थ माऊलीच्या कुटुंबियांना भेटून विचारपूस करत होते. दरम्यान १५ मार्च रोजी दुसऱ्या विहिरीत मृतदेहाचे मुंडके दोन हात व एक पाय असे अवयव मिळून आले होते.शरीराचे हे अवयव पाहून हा मृतदेह माऊलीच असल्याचे कुटुंबियांनी पोलिसांना स्पष्ट केले होते.यानंतर सातत्याने ग्रामस्थ आरोपी सापडला का?याची विचारणा माऊलीच्या कुटुंबीयांकडे करत होते.
विचारणा करणाऱ्यांमध्ये माऊलीचे मित्र देखील होते.याच मित्रांपैकी एक होता तो दाणेवाडी येथीलच सागर गव्हाणे.हाच गव्हाणे माऊलीचा खुनी असेल असे त्यावेळेस कोणाला वाटलेही नसेल. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात दाणेवाडी येथीलच माऊलीचे दोन मित्र आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सागर गव्हाणे याचा समावेश होता.याच गव्हाणे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपणच एका मित्राच्या सहाय्याने माऊलीचा खून केल्याचे त्याने कबूल केले.गव्हाणे याच्या साथीदाराचे वडील हे या क्रूर हत्येने व्यथित झाले होते.आरोपीचा छडा लागण्याआधी मीडियाशी बोलताना,त्यांनी जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशी झाली पाहिजे.असे मत व्यक्त केले होते.यात आपलाच मुलगा असेल असे त्यांच्या गावी नसावे.मात्र ज्यावेळी त्यांना समजले आपलाच मुलगा या गुन्ह्यात आरोपी आहे.त्यावेळी त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले होते.सागर व दुसरा अल्पवयीन आरोपी यांच्याशी माऊली याची चांगली मैत्री होती.मात्र केवळ आपले समलैंगिक संबंध माऊली समाजासमोर उघड करेल या भीतीने या आरोपींनी माऊलीचा क्रूरपणे काटा काढला.आरोपींचे वय पाहता इतकी क्रूर भावना त्यांच्या मनामध्ये कशी निर्माण झाली हा मोठा प्रश्न आहे.