आमदारपुत्र घटनेसंदर्भात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

0

शिरूर:आमदार पुत्राच्या अपहरण व खंडणी प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून एकमेकावर आरोपाच्या प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. समोर पराभव पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून यामुळेच ते आम्हाला बदनाम करायचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला तर आमदार याचे नाहक राजकारण करीत असून कोणाच्या पायाखालची वाळू सरकली हे २० तारखेला मतदारच ठरवतील असा टोला महायुतीच्या वतीने लगावण्यात आला आहे.

आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार यांच्या फिर्यादीनुसार भाऊ कोळपे यांच्यासह चौघांवर शिरूर पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा व खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आज आमदार पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली.आमदारकीसाठी विरोधक काही लोकांना हाताशी धरून आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा तसेच घटनेतील आरोपींना मोठा मासा प्रोत्साहन देत असल्याचा आरोप पवार यांनी केला.या घटनेमागचा मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज असून तशी मागणी पोलिसांकडे केल्याचे पवार म्हणाले.केवळ चार दिवसांपूर्वी संबंधित आरोपी ऋषीराज च्या संपर्कात आल्याचे त्यांनी सांगितले.आमच्या कुटुंबाने कधी गैरफायदा घेतला नसून लोकशाही मार्गाने निरपेक्ष भावनेने आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.आमच्या कुटुंबावर हनी ट्रॅपचा प्रयत्न होणार असल्याबाबत एक महिन्यापूर्वीच पोलिसांनी आम्हाला अलर्ट केल्याचे पवार यांनी सांगितले.घडलेल्या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी आपण केल्याचे आमदार पवारांनी सांगितले.पुरावा नसताना कोणाचे नाव घेणे योग्य नाही.पोलीस तपासात सत्य समोर येईलअसेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.आमदार पुत्राच्या संदर्भात घडलेली घटना अतिशय निंदनीय असल्याचे सांगतानाच या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला.आम्ही पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याची भेट घेऊन आरोपींची सखोल चौकशी करून याचा अहवाल जनतेसमोर लवकरात लवकर सादर करावा तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी विनंती केल्याचे तालुकाध्यक्ष काळे यांनी सांगितले.दुर्दैवाने याचे राजकीय भांडवल करून विरोधकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. आरोपी भाऊ कोळपे हे ऋषिराज पवार यांचे जवळचे सहकारी असून आमदार पवार यांनीच १४ मे २०२४ रोजी यवत येथील शरद पवार यांच्या सभेत कोळपे व त्यांच्या चुलत्यास पक्षात प्रवेश दिल्याचे काळे यांनी सांगितले.एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीवेळी बूथ क्रमांक १३१ वर कोळपे हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे बूथ प्रतिनिधी म्हणून अधिकृतपणे काम पाहत होते.तरीही आमदार पवार खासदार कोल्हे हे या घटने संदर्भात विरोधकांकडे बोट दाखवत आहेत. हे खेदजनक असल्याचे काळे म्हणाले.दसगुडे म्हणाले, ऋषिराज आमच्या मुलाप्रमाणे आहे.त्याच्या संदर्भात घडलेली घटना ही निषेधार्ह आहे.मात्र ही घटना भावनात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी आमदार पवार राजकीय दृष्टिकोनातून त्याकडे पाहत आहेत. विशेष म्हणजे,कधी घटना घडते आणि विरोधकांवर आरोप करतोय याची जणू आमदारांना घाई झाली होती.अशा प्रकारचे त्यांचे वर्तन होते.तसेच काहीही पुरावा नसताना त्यांनी या घटनेसंदर्भात विरोधकांकडे अंगुली निर्देश करण्याचा प्रयत्न केला.यामुळे या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून सत्य लवकरात लवकर समोर आणावे अशी आमची मागणी असल्याचे दसगुडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.