आदिशक्तीच्या वतीने वीटभट्टी कामगारांना मोलाची मदत

0
शिरूर :कोरोनामुळे माणूसकीची अनेक रूपं पाहवयास मिळत आहे. सद्य परिस्थितीत कोणी उपाशी राहू नये, मास्क, सैनिटायजर अभावी कोणी कोराना बाधित होऊ नये यासाठी समाजातील अनेक घटक मदतीसाठी पुढे येत आहेत. येथील आदिशक्ती महिला मंडळानेही आपला सामाजिक वारसा जोपासत रामलिंग येथील सव्वाशेहून अधिक वीटभट्टी कामगार कुटुंबांना किराणा किट व मास्कचे वाटप केले.
          कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले.ते कधी संपेल याची अद्याप खात्री नाही. लॉकडाऊनच्या कालावधी दररोज कमवून कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या लोकांसाठी त्रासदायक ठरला, ठरत आहे. लॉकडाऊनमुळे गेली दिड महिन्यांपासून वीटभट्टी व्यवसाय बंद आहेत.वीटभट्टी व्यावसायिक तर यामुळे अडचणीत आले आहेतच. मात्र या वीटभट्टयांवर रोजंदारीने काम करणाऱ्या कामगारांचे मात्र चांगलेच हाल सुरू आहेत.अशा कामगारांना आधार म्हणून आदिशक्तीच्या पुढाकाराने सव्वाशे किराणा कीटचे वाटप करण्यात आले.शासनाने सर्वांनाच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र जिथे खाण्याचीच भ्रांत तिथे मास्कला पैसे आणायचे कोठून हा या कामगारांसमोर प्रश्न होता. त्यांची ही समस्या पाहून आदिशक्तीने या कुटुंबांना धूवून वापरता येतील असे मास्कही उपलब्ध करून दिले.आदिशक्तीच्या या मदतीमुळे या कामगारांची सगळी समस्या सुटली नसली तरी त्यांनी केलेली मदत लाख मोलाची म्हणावी लागेल.
         आदिशक्तीच्या संस्थापिका शशीकला काळे, जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे, नगरसेविका मनिषा कालेवार, रामलिंग महिला उन्नति संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,आदिशक्तीच्या उषा वाखारे, सुवर्णा सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अपेक्षा गवारे आदिंनी वीटभट्टी जाऊन मदत पोहचवली. संदीप गवारे व सोमनाथ जगताप यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.