शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काहीही अनपेक्षित घडामोडी घडू शकतात.याची प्रचिती येत आहे.यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शिरूरची जागा राष्ट्रवादीला सोडल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपाचे उमेदवार असल्यास आश्चर्य वाटायला नको.
गेल्या काही दिवसांतील राज्यातील राजकीय वातावरण हे केवळ नेत्यांनाच नव्हे तर जनतेलाही संभ्रमात टाकणारे आहे.आपल्या नेत्याला देव मानून त्याच्यासाठी अश्रू ढाळणारे दुसऱ्याच दिवशी त्याच्या विरोधात जाताना महाराष्ट्राने पाहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपा शिवसेनेला कौल दिला.अशावेळी महाविकास आघाडी तयार होईल व सत्तेवर येईल असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. यानंतर शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बंड करतील व भाजपासोबत सत्ता स्थापन करतील असेही कोणाला वाटले नसावे.राजकारणाच्या या अनिश्चित व अस्थिर वातावरणामुळे अनेक नेत्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी बरोबरच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी राहिल्यास कोणते मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचे हा मोठा प्रश्न आघाडी समोर असणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण द्यायचे झाल्यास या लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता.यात राष्ट्रवादीने बाजी मारताना या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार आढळराव पाटील यांना पराभूत केले होते. साहजिकच आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या मतदारसंघावर आपला दावा सांगणार.तसे झाल्यास आढळराव पाटील यांच्यासमोर प्रश्न निर्माण होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला गेल्यास आढळराव पाटील शांत बसतील आणि आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील ही एक भाबडी कल्पना आहे.कारण या मतदारसंघाचे एकाहून जास्त वेळा प्रतिनिधित्व केल्यामुळे या मतदारसंघाच्या जनतेशी आढळराव पाटील यांची नाळ जोडली गेली आहे. यातच पराभूत होऊनही त्यांनी मतदारसंघातील जनतेशी संपर्क तोडलेला नाही.पुन्हा एकदा आपल्याला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे ही खूणगाठ मनाशी बांधून तेव्हापासून ते कार्यरत आहेत.यामुळे या मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी असा आढळराव पाटील यांचा शिवसेना पक्षप्रमुखाकडे आग्रह असणार आहे. याआधी याबाबत त्यांनी अनेकदा पक्षप्रमुखांशी चर्चा केली आहे. अलीकडे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने ते व्यथित झाले आहेत. यानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांची त्यांनी भेटही घेतली आहे.मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारी वाटपात शिरूरची जागा शिवसेनेला मिळण्याबाबत ते काहीसे साशंक असावेत.शिवसेनेला ही जागा न मिळाल्यास निवडणूक लढवण्याचा निग्रह केलेले आढळराव पाटील यांच्यासमोर भाजपाशिवाय पर्याय उरणार नाही.तसेही भाजपा त्यांच्यासाठी नवीन नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे तर केंद्रात भाजपा सरकार कार्यरत होते.(ज्यात शिवसेनेचाही समावेश आहे.) यामुळे आढळराव यांचे भाजपाच्या मंत्री व खासदारांची चांगले संबंध आहेत.
२०२४ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे सरकार येण्याची भाकीते वर्तवली जात असल्याने आढळराव पाटील यांना फायदा होण्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपाची उमेदवारी घेण्यासंदर्भात ते काय निर्णय घेतात.याबाबत यथावकाश समजेलच मात्र त्यांच्या समर्थकांना या निर्णयाची अपेक्षा असणार आहे. यामुळे आढळराव पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले भाजपाची उमेदवारी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यास भाजपाचे आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे (कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यास)असा सामना रंगण्याची शक्यता आहे.