वात्सल्यसिंधूने विधवांना दिला सौभाग्यावतीचा मान

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:सामाजिक प्रथेच्या जोखडामध्ये जीवन व्यतीत करणाऱ्या विधवांना वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या वतीने सौभाग्यवतीचा मान देऊन सन्मानित करण्यात आले एवढेच नव्हे तर त्यांना शिलाई मशीन देऊन उदरनिर्वाहाचे साधन तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात वात्सल्यसिंधू फाउंडेशन व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती यांच्या वतीने कोरोना काळात वैधव्य नशिबी आलेल्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला.घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, मुलांचे शिक्षण कसे करायचे याचा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला.अशा महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून त्यांना जीवनात पुन्हा उभे करण्यासाठी वात्सल्यसिंधू फाउंडेशनने पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी  कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सहकार्याने मेळाव्याचे आयोजन केले.महिलावर्ग जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकींना हळद कुंकू लावून एकमेकीच्या सन्मान करण्याची प्रथा आहे. विधवा प्रथेमुळे विधवांना सौभाग्यवतींप्रमाणे जीवन व्यतीत करता येत नाही.अलीकडे मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रथाना मूठमाती दिली जात असल्याचे समाधानकारक चित्र आहे.याचेच अनुकरण करत आजच्या मेळाव्यात वात्सल्यसिंधू फाउंडेशनने मेळाव्यात विधवांना सौभाग्यवतीप्रमाणेच हळद कुंकू लावून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या जीवनातील सामाजिक जोखडाचे साखळदंड तोडतानाच त्यांना शिलाई मशीन देऊन उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध करून दिले. त्यांच्या जीवनात त्यांना जगण्याची एक नवी उमेद निर्माण करून दिली.

विधवा महिला समाजाचा एक घटक असून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.त्यांना तो अधिकार मिळवून देण्यासाठी आमची सामाजिक लढाई असून तो अधिकार मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे व सचिव उषा वाखारे यांनी केले. पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी रेषा रेडकर,निर्मला चौभे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी संगीता बेंगाळ, व्हिजन स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार, सामाजिक कार्यकर्ते सागर नरवडे,हिलिंग लाइव्हसचे संतोष सांबारे, सबा शहा, वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे सदस्य कोमल त्रिवेदी पुष्पा जाधव,माधुरी निगडे,सोनाली रायबले,मनीषा देशमुख,शंकर जामदार आदी यावेळी उपस्थित होते.स्वाती थोरात यांनी सूत्रसंचालन केले  व आभार मानले.

व्हिजन स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी पूजा पोखरणा यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत विधवा  महिलांना साडी चोळी,गृहपयोगी वस्तू देऊन सन्मानित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.