शिरूर नामा न्यूज नेटवर्क
शिरूर:देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना न्यायव्यवस्थेत जुन्या पद्धतीचे कामकाज अपेक्षित न ठेवता आधुनिकीकरणाची कास धरली पाहिजे. आधुनिकीकरण व उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पक्षकारांना जास्त चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकू असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी येथे व्यक्त केले.
शिरूर न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण न्यायमूर्ती ओक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार, न्यायमूर्ती राजेंद्र अवचट जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश संजय देशमुख शिरूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल कुलकर्णी,न्यायाधीश पी एफ सोनकांबळे, टी एस वाकडीकर, के एम मुंडे,आमदार अशोक पवार महाराष्ट्र व गोवा बार कन्सिल कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप,सदस्य हर्षद निंबाळकर शिरुर बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गिरमकर,उपाध्यक्ष सरिता खेडकर आदींसह शिरूर बार कौन्सिल चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.न्यायमूर्ती ओक यांनी न्यायप्रक्रियेत तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करताना तंत्रज्ञानाच्या वापराने गैरप्रकार कमी होतात तसेच त्याचे अनेक फायदे मिळू शकतात असे नमूद केले. कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश असताना त्यांनी तेथे राबवलेल्या ई फाइलिंगचे फायदे सांगताना तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.कोविड काळात न्याय प्रक्रियेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा लागला. सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र त्याचा फायदा झाला.आपत्ती सांगून येत नाही यासाठी तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे आहे.असे ओक म्हणाले. कोविड काळात चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकलो नाही.आता कोविडचे संकट दूर होत असताना पेंडन्सी कमी करण्याचा निर्धार करूयात असे आवाहन न्यायमूर्तीओक यांनी यावेळी केले.
न्यायमूर्ती जामदार यांनी जुन्या केसेस बद्दल चिंता व्यक्त करताना शिरूर न्यायालयात दहा वर्ष जुन्या दिवाणी ६४७ तर फौजदारी ९१० केसेस असल्याचे सांगितले. न्यायाधीश या केसेस संपवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र यात वकिलांचे सहकार्य अपेक्षित आहे.शिरूरच्या वकिलांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन न्यायमूर्ती जामदार यांनी यावेळी केले. शिरूरचे रहिवासी असलेल्या न्यायमूर्ती अवचट यांनी येथे शिक्षण घेऊन प्रतिकूल परिस्थितीत न्यायमूर्ती पर्यंतचा प्रवास कसा साधला याचा उलगडा केला. प्रास्ताविकात शिरूर बार असोसिएशनचे गिरमकर म्हणाले, शिरूर न्यायालयाची इमारत १२५ वर्ष जुनी असल्याने तसेच न्यायालयीन व्याप वाढल्याने नवीन इमारतीसाठी उच्च न्यायालय प्रशासनाकडे निधीसाठी प्रस्ताव देण्यात आला होता.प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला.आमदार पवार यांनी यात जातीने लक्ष घालून निधी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.शासनाने यासाठी ३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून तीन मजली अद्यावत व सुविधायुक्त इमारत तयार होणार असून यात सहा कोर्ट हॉल आहेत.
न्यायमूर्ती ओक यांनी तालुका व जिल्हा न्यायालय न्याय व्यवस्थेचा पाया असल्याचे नमूद करताना तालुका ठिकाणी काम करणाऱ्या वकिलांनी न्यूनगंड बाळगू नये असे आवाहन केले.सर्वोच्च उच्च व जिल्हा न्यायालयात काम करणारे वकील तेच काम करत असतात फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते. तालुका ठिकाणी काम करणारे वकील पक्षकाराला समाधान व न्याय देण्याचा प्रयत्न करतात.सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत हे चांगले काम असल्याचे सांगून न्यायमूर्ती ओक यांनी तालुक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या वकिलांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. शिरूर न्यायालयाची इमारत दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावी अशी अपेक्षा ओक यांनी यावेळी केली.