स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे तालुका भाजपा समोर आव्हान

माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाची उणीव भासणार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर: तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे निर्विवाद प्राबल्य असून या संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला आव्हान देण्यास सध्याची भाजपा यंत्रणा कितपत यशस्वी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाविनाच भाजपाला राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवावी  लागणार असल्याने त्यांची परीक्षा असणार आहे.

          राज्यात सध्या राजकीय भूकंपाची परिस्थिती असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा थंडावली आहे.तरीही पुढील काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. तालुक्यात जिल्हापरिषद – पंचायत समिती,रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना,तालुका खरेदी विक्री संघ,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शिरूर नगरपरिषद या संस्थांच्या या निवडणुका होणार आहेत.जि प, पं स,कारखाना,बाजार समिती व खरेदी विक्री संघ या संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे तर शिरूर नगर परिषदेवर प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या सातही गटात राष्ट्रवादीचे सदस्य आहेत तर पंचायत समितीच्या १४ सदस्यां पैकी ९ राष्ट्रवादीचे आहेत
तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे  यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली.विद्यमान आमदार असल्याने पाचर्णे यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.मात्र जि प,पं स वर कायमच वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात पाचर्णे यांना यश मिळू शकले नाही.शिरूर – न्हावरे जिल्हा परिषद गटात त्यांच्या मुलाला पराभवाचे तोंड पाहावे लागले.
           घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही माजी आमदार पाचर्णे यांना आपला करिश्मा दाखवता आला नाही.घोडगंगाचे अध्यक्ष तत्कालीन माजी आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना २१ पैकी २१ जागा निवडून आणल्या. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल ने बाजी मारली.१७  पैकी १३ जागा जिंकल्या. तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत निवडणुकीतही राष्ट्रवादीने सत्ता राखताना १७ पैकी १५  जागा जिंकल्या. एकंदरीतच विधानसभा निवडणूक निवडणुकीत पराभव होऊनही  पवार यांनी या तीनही संस्था आपल्या ताब्यात ठेवत या संस्थांवरील आपली पकड दाखवून दिली.खरंतर शिरूर तालुक्याच्या राजकारणात वन मॅन आर्मी म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी आमदार पाचर्णे यांना मानणारा तालुक्यात,शिरूर हवेली मतदार संघात मोठा वर्ग आहे.भाजपाच्या उमेदवारीवर ते दोन वेळा निवडून आले असले तरी यात त्यांच्या वैयक्तिक संपर्काचा फार मोठा वाटा आहे.१९९५ व १९९९  विधासभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते.मात्र त्यांना त्यावेळी मिळालेली मते हा त्यांचा जनतेवर असलेला प्रभाव सिद्ध करणारा होता.त्यांच्या साथीला त्यांच्या तोलामोलाचा नेता कधीच न्हवता.त्यांनी कायमच एकहाती किल्ला लढविला.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिरूर (नंतर शिरूर- हवेली) विधानसभा मतदारसंघात पाचर्णे यांनी दोन वेळा राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र त्यांना कधीच पूर्णतःआपले वर्चस्व निर्माण करता आले नाही.थोड्या फार जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले.जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलेले पाचर्णे सध्या प्रकृती अस्वास्थ्यमुळे गेली काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत.यामुळे त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाशिवाय बी जे पी ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे.पाचर्णे यांच्या नेतृत्वाविना तालुका बी जे पी तशी कमजोरच आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण तालुक्यातील जनतेवर पकड असलेला त्यांच्या इतका स्ट्राँग नेता तालुका बीजेपीत नाही.पाचर्णे यांना या संस्थांवर वर्चस्व निर्माण करता आले नसले तरी काही जागा जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे.या जागा राखण्याचेही बीजेपी समोर आव्हान असणार आहे.बी जे पी हे आव्हान कसे पेलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची  निवडणूक ३१ जुलैला होत असून कारखान्याचे अध्यक्ष,आमदार अशोक पवार यांच्या पॅनल विरुद्ध घोडगंगा  किसान क्रांती पॅनेल असा सामना रंगणार आहे.कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुधीर फराटे,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे,सुरेश पलांडे आदी घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. सुधीर फराटे हे गेली ३ वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष पवार यांच्यावर सडकून टीका करीत असून पवार यांच्यामुळे कारखान्याची दुर्दशा झाल्याची भूमिका सातत्याने मांडत आहेत. ‘२५ वर्ष घोडगंगा लुटीची,येणारी ५ वर्ष सभासदांच्या एकजुटीची’ असा नारा त्यांच्या पॅनेलने दिला असून सभासद या पॅनेलला कसा प्रतिसाद देतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मात्र निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.