कोणी आघाडीची उमेदवारी देता का?

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर: हमखास निवडून यायचे असेल तर शिरुर शहर विकास आघाडीचीच उमेदवारी मिळायला हवी अशी बहुतांशी इच्छुक उमेदवारांची तीव्र इच्छा असते.मात्र सर्व इच्छुकांचे समाधान करणे आघाडीला शक्य नसते.तरीही इच्छुकांची ‘कोणी आघाडीचे तिकीट देता का,,?’म्हणून शेवटपर्यंत आरोळी ऐकायला मिळते.

          नगरपरिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून नगरसेवक होण्याच्या स्वप्नात दंग असलेल्या मंडळींनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावण्याची तयारी सुरू  केल्याचे चित्र आहे.ज्या पॅनल कडून निवडून येण्याची खात्री आहे अशा पॅनल कडूनच उमेदवारी मिळावी असा सर्वांचाच अट्टाहास असतो.२००७ पासून शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची निर्विवाद सत्ता असून या पॅनलचे प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांची शहरावर चांगलीच पकड आहे.शहराचा सर्वांगीण विकास,विकासासाठी आवश्यक तिथे स्वनिधीचा वापर यामुळे नागरिकांचाही धारिवाल यांच्या नेतृत्वावर अर्थातच विकास आघाडीवर विश्वास निर्माण झाला आहे. वास्तविक धारीवाल यांची नगरपरिषद राजकारणात उतरण्याची बिलकुल इच्छा नव्हती.शिरूरकरांच्या आग्रहाखातर २००७ साली धारिवाल यांची शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात एंट्री झाली. रसिकभाऊ धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस स्थापन झालेल्या शिरुर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून प्रकाश धारिवाल यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली.चांगल्या मतांनी ते निवडूनही आले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्यांना नगराध्यक्षपदाचीही संधी मिळाली. त्यावेळच्या निवडणुकीत आघाडीने १७ पैकी १६ जागा जिंकून नगरपरिषदेवर एकहाती सत्ता स्थापन केली.रसिकभाऊ धारिवाल यांचे मार्गदर्शन,वैयक्तिक जिज्ञासा यातून अल्पावधीतच प्रकाश धारीवाल यांनी नगरपरिषद  राजकारणाशी जुळवून घेतले.दातृत्वसंपन्न असलेल्या धारिवाल कुटुंबाला नगरपरिषदेतून काही मिळवायचे नव्हते.शहरासाठी योगदान देण्याची आजोबा व वडील यांची परंपराच प्रकाश धारिवाल यांना पुढे न्यायची होती.त्यांनी याचे सकारात्मकपणे अनुकरण करताना पुढील काही वर्षातच विकासशील नेतृत्वाचे दर्शन शिरूरकरांना घडविले.याचा परिणाम २०१२  च्या निवडणुकीत आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.एकहाती सत्तेचा गर्व न करता शहराच्या विकासाशी असलेली वचनबद्धता कायम राखत त्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली.
            २०१७ च्या निवडणुकीत खरंतर
विकास आघाडीला गमावण्यासारखे काही नव्हते.मात्र त्या कालावधीत रसिकभाऊ यांची प्रकृती ठीक नव्हती.त्यांच्या अनुपस्थित प्रकाश धारीवांल यांनी आघाडीच्या नेतृत्वाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.एकीकडे वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता तर दुसरीकडे निवडणुकीचा संग्राम.अशा द्विधा मनस्थितीतही त्यांनी न डगमगता निवडणूक लढवली.त्यावेळी आघाडीच्या विरोधात तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी बीजेपीचा पॅनल उभा केला.या पॅनेलसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिरूरमध्ये सभा घेण्यात आली. या सभेमुळे बीजेपी पॅनलमध्ये उत्साह संचारला.तरीही बीजेपीला सत्ता हस्तगत करण्यात यश मिळाले नाही. २१ पैकी त्यांच्या केवळ २ जागा निवडून आल्या.२ अपक्ष निवडून आले आघाडीने सत्ता राखताना  १७ जागा जिंकल्या.नगराध्यक्ष निवड जनतेतून होती.यातही आघाडीने सहज बाजी मारली.सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून धारिवाल यांनी नगरपरिषदेवरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली.निरपेक्षपणे विकास कामे करत राहणे या धारिवाल यांच्या फॉर्म्युल्याला जनतेने स्वीकारल्याचे दिसून आले.यातून धारीवाल यांची विकास आघाडी म्हणजे यश असं गणित तयार झाले. मग अशा आघाडीची  उमेदवारी कोणाला नको? उद्याच्या निवडणुकीत या आघाडीचीच उमेदवारी मिळावी म्हणून बहुतांशी इच्छुकांनी कंबर कसली असून यात किती जणांना यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे  ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.