शिरूरमधील कुंभार समजाची विधवा प्रथेला तिलांजली

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क 
शिरूर: सामाजिक बहिष्काराच्या जोखडात जीवन व्यतीत करणाऱ्या विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे म्हणून महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा ठराव केला.शहरातील कुंभार समाजाने याचे अनुकरण करत वटपौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.असा ठराव करणारा राज्यातील कुंभार समाज हा पहिला समाज ठरल्याचे मत शिरूर तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार यांनी व्यक्त केले.
            समाजातील प्रथा परंपरा आपल्या देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र ज्या प्रथा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही अशा प्रथांना मूठमाती गरजेचे आहे.पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो.आयुष्यभर या बहिष्काराच्या जोखडामध्येच जीवन व्यतीत करावे लागते.हा तिच्यावर एक प्रकारचा अन्यायच आहे.वर्षानुवर्ष होत असलेला अन्याय दूर व्हावा याबाबत महाराष्ट्रात लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे.हा एक सामाजिक क्रांतीचाच भाग म्हणावा लागेल.सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य ठराव केला.यानंतर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे अनुकरण करत ठराव केले.शहरातील कुंभार समाजाने विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा निर्णय घेऊन क्रांतीचे एक पाऊल पुढे टाकले असेच म्हणावे लागेल. कारण एक समाज म्हणून राज्यातील कुंभार समाज हा पहिला समाज ठरला आहे.समाजाच्या ह्या निर्णयाचे समाजातील महिलांनी स्वागत  व कौतुक केले असून इतर समाजासाठी हा निर्णय दिशादर्शक ठरेल अशी भावना जामदार यांनी व्यक्त केली.
          स्वप्नाली जामदार म्हणाल्या,महिलांचे वैधव्य हा काही महिलांचा दोष नाही.मात्र विधवा प्रथेमुळे या महिलांना नाहक धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहापासून दूर ठेवले जात आहे.या प्रथांचे उच्चाटन केल्यास निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतील.वैशाली जामदार यांच्या अध्यक्षतेखाली
कुंभार समाजाने आयोजित केलेल्या सभेत
अनेक महिलांनी याबाबत आपले मत प्रदर्शित केले.वात्सल्यासिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा लंघे,सचिव उषा वाखारे,स्वाती थोरात,पुष्पा जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यानंतर सर्वानुमते विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा स्तुत्य ठराव मंजूर करण्यात आला.साधना राजापूरे यांनी सूचक तर सुनीता जाधव यांनी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.