शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:करडे व सरदवाडी भागात रांजणगाव एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली असून या भागात येऊ घातलेल्या कारखान्यांच्या उभारणीपासून ते पूर्णत्वास येईपर्यंत तसेच कारखाने सुरू झाल्यावरही प्रत्येक काम आम्हालाच मिळायला पाहिजे.या इर्षेतून संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे.याला वेळीच आवर न घातल्यास भविष्यात त्याचे विपरीत परिणाम निदर्शनास येण्याची शक्यता आहे.
रांजणगाव एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शासनाने शिरूर तालुक्यातील करडे व सरदवाडी भागातील ३००.२४ हेक्टर जागा संपादित केली आहे.या जागेवर राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे उभे राहणार आहे.याची सुरुवात झाली असून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नावाजलेली आय एफ बी या कारखान्याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.या कारखान्याचे भूमिपूजन झाल्यापासूनच या भागात काम मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कामासाठी लागणारे जेसीबी,पोकलेन पासून ते पाण्याचे टॅंकर पर्यंत प्रत्येक काम आम्हालाच मिळायला हवे यासाठी वारंवार छोटे-मोठे वाद घडत असल्याची माहिती आहे.या कारखान्याच्या प्रोजेक्टचे काम पाहणाऱ्या व्यक्तीची मात्र यात ससेहोलपट होताना दिसत आहे. एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी करडे तसेच सरदवाडी या गावाच्या हद्दीतील जमिनी संपादित करण्यात आल्या असल्याने आमच्या जमिनी गेल्या आम्हाला काम मिळाले पाहिजे असा या दोन्ही गावातील लोकांचा आग्रह आहे.दोन्ही गावातील लोकांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.मात्र गेल्या काही महिन्यातील चित्र पाहता काम मिळवण्यावरून या दोन्ही गावातील तरुणांमध्ये वाद होताना आढळून आले आहे.या आठवड्यात एका कामाच्या वादातून दोन्ही गावचे तरुण एकमेकांना भिडले यातून मारहाण झाली.तरुण जखमी झाले.एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होऊन गुन्हेही दाखल झाले.या तरुणांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे. कोणाच्या जीवावर हे तरुण एवढे धाडस करतात याचा शोध घेणे गरजेचे आहे.पोलीस रेकॉर्डला नाव नोंदले गेल्यावर याचा भविष्यावर काय विपरीत परिणाम होतो याची कदाचित या तरुणांना कल्पना नसेल.किमान त्यांना बळ देणाऱ्या व्यक्तींनी अथवा पालकांनी या तरुणांना याची कल्पना देणे गरजेचे आहे.
एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यावर काही राजकीय पुढाऱ्यांचे नियंत्रण असून काम मिळवायचे असल्यास त्यांच्या माध्यमातूनच जावे लागते.अशी चर्चा आहे. एखादे काम हवे असल्यास या पुढाऱ्यांच्या बगलबच्यांच्या नावावर पी ओ काढावी लागते.म्हणजेच काहीही न करता रग्गड टक्केवारी मिळवण्याचा धंदा येथेही सुरू झाल्याचे चित्र आहे.पूर्ण क्षमता असताना इथे सरळ मार्गाने काम मिळवणे अवघड होऊन बसले आहे.एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होते कुठे तोच काम मिळवण्याच्या इर्षेतून तरुणांमध्ये वाद,हाणामारी होऊ लागली आहे.नवनवीन कारखाने जसजसे या टप्प्यात सुरू होतील तसतशी कामे मिळवण्याची स्पर्धा वाढतच जाणार आहे. ही स्पर्धा जीवघेणी बनू नये याची आत्ताच दक्षता घेणे गरजेचे आहे.करडे व सरदवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यात पुढाकार घेऊन सामंजस्याने या समस्या सोडवल्या पाहिजेत.या समस्यांकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
.