शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:रक्तदान शिबिर आयोजनाबाबत वेळोवेळी अमूल्य असे योगदान दिल्याबद्दल येथील मोरया जिमचे संयोजक योगेश जामदार यांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि आनंदऋषीजी ब्लड सेंटर यांच्या वतीने अहमदनगर येथे रक्तदान शिबिर संयोजक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यामध्ये मोरया जिमचे संयोजक जामदार यांना गौरवण्यात आले. रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बंगड, प्रसिद्ध उद्योजक मनोज छाजेड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.केवळ शरीरसौष्ठव स्पर्धाच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असणाऱ्या मोरया जिमने ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आहे हा संदेश देण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजनाचा निर्णय घेतला.या उपक्रमासाठी आपल्या दातृत्वाबद्दल देशभरात प्रसिद्ध असलेल्या रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनाची निवड करण्यात आली.गेली चार वर्षांपासून मोरया जिम धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असून या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी ८०० हून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. विशेष म्हणजे मोरया जिमचे सर्व सदस्य,सहकारी स्वतः रक्तदान करून या शिबिरामध्ये योगदान देत आहेत.या शिबिराचे आयोजक जामदार व त्यांचे सहकारी रक्तदानासाठी करीत असलेल्या आवाहनाला शहरातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. रसिकभाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त संकलित होत असलेल्या रक्तातून अनेकांना जीवदान मिळाले असून याचा आम्हाला मनस्वी आनंद होत असल्याची भावना जामदार यांनी ‘शिरुरनामा’शी बोलताना व्यक्त केली.
सामाजिक,शैक्षणिक तसेचआध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या दातृत्वामुळे रसिकभाऊंनी अलौकिक ठसा उमटवला असल्याने त्यांच्या स्मृतीदिनाची रक्तदान शिबिरासाठी निवड केल्याचे जामदार यांनी सांगितले. रक्तदान शिबिराची ही सेवा अखंडितपणे सुरू राहील. असा विश्वास जामदार यांनी व्यक्त केला.मोरया जिमचे बंटी जोगदंड,विक्रम जामदार आदी यावेळी उपस्थित होते.
“आपण घेत असलेल्या रक्तदान शिबिरमुळे बहुमोल मानव जीव वाचवण्याचे श्रेय आपणास मिळत आहे आपल्यासारख्या निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या नागरिकांचा आणि आपल्या संघटनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’अशा शब्दांमध्ये मोरया जिमबद्दल जैन सोशल फेडरेशनने कृतज्ञता व्यक्त केली.