पवार व धारीवाल यांच्यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य-पै.अशोक पवार
मोठ्या तालमीतील मल्लांना राष्ट्रीय कोचचे मार्गदर्शन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: आमदार अशोक पवार व सभागृहनेते प्रकाश धारीवाल शिरूरच्या कुस्तीला बढावा देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असून यामुळे शिरूरच्या कुस्तीला उज्वल भविष्य लाभणार असल्याचे महाराष्ट्र चॅम्पियन,माजी नगरसेवक पै.अशोक पवार यांनी येथे सांगितले.
शहरातील मोठी तालीम ही लाल मातीची तालीम म्हणून प्रसिद्ध आहे.राज्य,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हायचे असेल तर माती बरोबरच मॅटचाही येथील मल्लांना सराव असणे गरजेचे आहे हे ओळखून महाराष्ट्र चॅम्पियन,माजी नगरसेवक पै.अशोक पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तालमीत लोकवर्गणीतून मॅटची सुविधा उपलब्ध करून दिली.याबरोबरच राष्ट्रीय विजेता तसेच एन आय एस क्वालीफाईड असलेले सोनू तंवर(हरयाणा)यांची या तालमीत कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली.मल्लांचा मॅटवर सराव सुरू असताना पै. पवार यांनी नवोदित मल्लांबरोबर संवाद साधताना उपरोक्त माहिती दिली.पै.पवार म्हणाले,कुस्तीचे प्रस्त वाढवण्यासाठी आमदार अशोक पवार व सभागृहनेते धारीवाल यांनी सकारात्मकता दाखवली असून शिरूरच्या कुस्तीला यामुळे उज्ज्वल भविष्य लाभणार आहे.यातूनच शिरूरचे मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित झळकतील असा विश्वास पै.पवार यांनी व्यक्त केला.पै.पवार व युवा उद्योजक आशिष शिंदे यांनी मागील आठवड्यात सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेचे येथे यशस्वी आयोजन केले.याबाबत बोलताना पै.पवार यांनी,ग्रामीण भागातील मल्लांना राष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा खेळ पाहण्यास मिळावा व यातूनच त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची प्रेरणा मिळावी हा स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू असल्याचे नवमल्लांसमोर स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांनी,राष्ट्रकुल स्पर्धेचे विजेते तसेच महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेले रघुनाथदादा पवार यांचा आवर्जून उल्लेख करताना,शिरूरच्या मोठ्या तालमीत सराव केलेल्या पवार यांनी पुढे सैन्यदलात जाऊन कुस्तीच्या माध्यमातून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल्याची माहिती नवोदित मल्लांना दिली.रघुनाथदादा यांच्यानंतर या तालमीत अनेक मल्लांनी जिल्हा,राज्य स्तरावर यश मिळवले.दिवंगत दत्तात्रय कालेवार,वस्ताद तांबोळी,सिकलकर,उपमहाराष्ट्र केसरी सचिन यलभर,शशिकांत माने, विजय गव्हाणे,गोविंद नरवडे, हरी वीर आदींचा यात नामोल्लेख करावा लागेल.ज्या तालमीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल देशाला दिला,त्या तालमीत सराव करत असलेल्या मल्लांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे ध्येय ठेवावे,असे आवाहन बोरा यांनी यावेळी केले.युवा उद्योजक पै.आशिष शिंदे,सखाराम फंड,राजू भोसले,त्रिदल सेना माजी सैनिक संघटनेचे शिरुर तालुकाध्यक्ष बबन पवार,कैलास सातपुते,विजय लंघे यांच्यासह नवोदित मल्ल यावेळी उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक पै.अशोक पवार यांचा नवोदित मल्लांच्यावतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला.