कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत-सत्यभामा सौदरमल
तेजस्विनी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कौटुंबिक हिंसाचारास दारूचे व्यसन सर्वाधिक कारणीभूत असून समुपदेशनासाठी येणाऱ्या बहुतांशी केसेस या संदर्भातल्या असतात.अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या,समुपदेशक सत्यभामा सौंदरमल यांनी येथे दिली.
तेजस्विनी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी समुपदेशन केंद्राचे उद्घाटन सौदरमल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण,ज्योती पारधे,वात्सल्यसिंधू फाऊंडेशनच्या सचिव उषा वाखारे,उषा घरत,भाजपा अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या सहप्रदेशाध्यक्ष रेश्मा शेख,माजी सरपंच जिजा दुर्गे,अनुपमा वाखारे,थोरात विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती थोरात,शैला गायकवाड आदी यावेळी उपस्थित होत्या.सौदरमल म्हणाल्या,कौटुं बिक हिंसाचारास अनेक मुद्दे कारणीभूत आहेत.मात्र अशाप्रकारच्या हिंसाचारास दारूचे व्यसन हे सर्वाधिक कारणीभूत असल्याचे दिसून येते.आजकाल दारू व सिगारेट चे व्यसन असलेली मुले मुलींना(सर्वच नाही)आवडतात.पुढे यातूनच कौटुंबिक हिंसाचारास आमंत्रण मिळताना दिसते.याचा मुलींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.यावेळी सौदरमल यांनी विविध विषयांबाबत समर्पक अशी माहिती दिली.पारधी समाजाच्या पहिल्या लेखिका म्हणून बहुमान मिळवलेल्या सुनिता भोसले यांनी यावेळी आपला जीवन प्रवास उलगडून दाखविला.आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही दलित आदिवासी भटके विमुक्त समाजातील घटक अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत.या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा असून शेवटपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे भोसले म्हणाल्या.आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर महिलांनी महापुरुष समजून घेतले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार भोसले यांना जाहीर झाला असून याबद्दल त्यांचा तेजस्विनी फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
समुपदेशन हे एक सामाजिक कार्य असून आपण या माध्यमातून अनेक विस्कटलेले संसार जोडण्याचे काम केल्याचे दक्षता समितीच्या माजी अध्यक्षा शोभना पाचंगे यांनी यावेळी सांगितले.गेली तेरा वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैशाली चव्हाण या तेजस्वीनी समुपदेशन केंद्राच्या संस्थापिका असून या केंद्राच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पारधे यांनी सूत्रसंचालन केले,वर्षा काळे यांनी आभार मानले.