शिरूर विकासाभिमुख आमदार म्हणून जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेल्या आमदार अशोक पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकून राजकारणातले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पवार यांनी आपल्या पक्षात तसेच मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला आहेच मात्र पवार यांची घोडदौड पाहता विरोधक गलितगात्र झाले आहेत की काय असा प्रश्न पडू लागला आहे.
प्रवीण गायकवाड
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अ वर्ग गटातून आमदार पवार यांनी विक्रमी मतांनी विजय संपादन केला.या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या निवृत्तीअण्णा गवारी यांनी आपली उमेदवारी माघारी घेतल्यानंतर आमदार पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला होता.मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची पद भूषवलेल्या आबासाहेब गव्हाणे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या जागेसाठी निवडणूक झाली.यात अपेक्षेप्रमाणे पवार यांनी १०९ मते मिळवून विजय साकारला.पवार यांना मिळालेली मते पाहता विरोधकांचे विजयाचे दावे किती पोकळ होते हे दिसून आले.विविध कारणांमुळे या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागण्याचा अंदाज बांधला जात होता.गवारे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असली तरी गवारी व पवार यांच्यात गेली अनेक वर्षापासून असलेले राजकीय वितूष्ट सर्वश्रुत आहेत.यामुळे गेली तीन पंचवार्षिक बँकेचे संचालकपद भूषवलेल्या गवारी यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती.गवारी यांच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशात तीनही वेळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी गव्हाणे यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी ज्याच्या मागे उभा राहतो तो उमेदवार निवडून येतो.यामुळे यावेळीही गव्हाणे विजयी होतील असा दावा पाचर्णे यांनी मतदानाच्या दिवशी केला होता.
शिरूर तालुक्यातील आंबेगाव मतदारसंघाला जोडले गेलेल्या ३९ गावातील मते मिळण्यात आमदार पवार यांना अडचण निर्माण होऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात होती.याचे कारण या भागाचे आमदार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, या ३९ गावांमध्ये कायम वर्चस्व राहिलेल्या माजी आमदार पोपटराव गावडे,बाजार समितीचे सभापती प्रकाश पवार आदींची भूमिका महत्त्वाची ठरणार होती.या सर्वांबरोबर आमदार पवार यांचे असलेले ‘गोड’ संबंध पाहता ही अडचण निर्माण होण्याची अटकल बांधली जात होती.मात्र राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेला माजी आमदार गावडे यांचा सहस्त्रचंदन सोहळा आमदार पवार यांच्या पथ्यावर पडला.या सोहळ्याच्या नियोजनात आमदार पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या सोहळ्यामुळे आमदार पवार यांच्या बाजूने अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकली.
पक्षातील तसेच समोरील विरोधकांना चारीमुंड्या चीत करून आमदार पवार यांनी मिळवलेले यश त्यांचे राजकीय वर्चस्व अधोरेखित करणारे आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेले ४० हजारांहून अधिक मताधिक्य विरोधकांचे मनोधैर्य खच्ची करणारे होते.या निवडणुकीनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी आमदार पाचर्णे दोन वर्ष सक्रिय नसल्याचे दिसून आले.पाचर्णे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात विरोधक आहेत की नाही असाच प्रश्न निर्माण झाला.यातच आमदार पवार यांनी विकासाला गती दिल्याने पवार यांना आता प्रतिस्पर्धी उरला नाही अशी चर्चा होऊ लागली.नोव्हेंबर महिन्यात आपल्या वाढदिवशी माजी आमदार पाचर्णे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून आपले कार्यालय तसेच निवास्थानी उपस्थिती लावली. त्यांच्या समर्थकांनी गर्दी करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.साहेब आता सक्रिय झाले म्हणून कार्यकर्त्यांना आनंद झाला.कारण आमदार पवार यांना रोखण्याची ताकद आपल्या साहेबांमध्ये आहे हे कार्यकर्ते जाणून आहेत.मात्र येथून पुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाचर्णे यांनी गव्हाणे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.
पुढील काही महिन्यांमध्ये साखर कारखाना, पंचायत समिती-जिल्हा परिषद,खरेदी विक्री संघ आदी निवडणूका होणार आहेत.या सर्व संस्थांवर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.सध्याची विरोधकांची परिस्थिती पाहता या संस्थांच्या आगामी निवडणुकीत ते किती तग धरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी आमदार पाचर्णे यांच्या सक्रिय होण्यावर मर्यादा आल्याने विरोधकांची ताकद कमी झाल्याचे वास्तव आहे.यामुळे आमदार पवार यांची विजयी घोडदौड रोखण्याचे विरोधकांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
गेली २२ वर्षापासून आमदार पवार हे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.या कारखान्यावर त्यांची एक हाती सत्ता आहे.कारखान्याच्या संदर्भात त्यांच्यावर आरोप होत असतात.मात्र कारखान्यावर त्यांची मजबूत पकड असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.आमदार म्हणून त्यांची कारकीर्द सकारात्मक दिसून येत आहे.यातच पुणे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांची निवड झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.