शिरूरच्या पश्‍चिम पट्ट्यात मोरांचे अस्तित्व धोक्यात

शासनाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिक्रापूर: शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात काही भागात होत असलेल्या उत्खननामुळे या पट्ट्यातील गावांमध्ये आढळणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.अन्न,पाण्याच्या दुर्भिक्षानंतर आता उत्खननाच्या समस्येमुळे मोराचे स्थलांतर होऊ लागले असून या भागात मोराचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

          शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील मोराची चिंचोली, शास्ताबाद,लाखेवाडी,मलठण परिसरात मोठ्या प्रमाणात मोरांचे वास्तव्य असून तीन हजाराहून अधिक मोर या ठिकाणी आहेत.विशेष म्हणजे वीस वर्षा पूर्वी मोरांचे मोठ्याा प्रमाणावर अस्तित्व असणाऱ्या मोराची चिंचोली गावाला ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. मोरांच्या वास्तव्यामुळे मोराची चिंचोली सह इतर गावांमध्ये पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे.मोर पाहण्यासाठी राज्यातील विविध भागातील भागातून पर्यटक या भागात गर्दी करताना दिसत आहेत. अन्नपाण्याचा दुर्भिक्षामुळे अनेकदा मोर स्थलांतर करतात.मात्र अलीकडे या भागात होत असणाऱ्या उत्खननामुळेही मोरांचे स्थलांतर होतानाचे दुर्दैवी चित्र आहे.मोर राष्ट्रीय पक्षी आहेच मात्र या भागातील ग्रामस्थांसाठी मोर हा त्यांच्या कुटुंबियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.अलीकडच्या काही वर्षात शासनाचे मात्र या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वास्तविक राष्ट्रीय पक्षाचे संवर्धन करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.शासनाने याची गांभीर्याने दखल घेत पर्यावरण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या भागातील सोयी-सुविधा व पाण्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे तसेच या भागात उत्खनन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.भविष्यात या भागातील मोरांचे स्थलांतर होऊ नये यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा मोराच्या अस्तित्वासाठी वेळ पडल्यास आंदोलनाचे अस्त्र उगारले जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात या भागातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुखमंत्री, उपमुख्यमंत्री,वनमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून  निवेदन देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.