शिरूर:सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शहराचा नियोजनबद्ध विकास होत असून जिथे जिथे आवश्यकता आहे आहे तिथे आमदार अशोक पवार यांची त्यांना साथ मिळत आहे.म्हणजेच धारिवाल व पवार यांच्या समन्वयामुळे शहराच्या विकासाला गती मिळतानाचे चित्र आहे.कोणाला जरी या जोडीचे वावगे असले तरी शिरूरकरांना मात्र निश्चितच ही जोडी हवी असणार आहे.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर वार्तापत्र
प्रवीण गायकवाड
गेल्या काही दिवसांपासून शहरात एक निनावी पत्राची चर्चा रंगलेली दिसत आहे.या पत्रात प्रामुख्याने आमदार पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे.या निनावी पत्रात,शिरूर नगरपरिषदेच्या कारभारात पवार व त्यांचे कुटुंबीय ढवळाढवळ करीत आहे,धारीवाल यांचे शहरातील वर्चस्व कमी करून आपले वर्चस्व वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.नगरपरिषद हद्दीतील काही भूखंडांवर आमदार पवार यांचा डोळा आहे.वगैरे वगैरे.नगरपरिषदेचे राजकारण पाहता धारीवाल कुटुंबाचे नगरपरिषदेवर कायमच वर्चस्व राहिले आहे.रसिकभाऊ धारीवाल जितकी वर्ष नगरपरिषदेच्या राजकारणात कार्यरत राहिले,या कालावधीत शिरूरकरांनी भाऊंवर नेहमीच प्रेम केलं.२००७ साली प्रकाश धारिवाल यांनी नगरपरिषदेच्या राजकारणात (इच्छा नसताना)प्रवेश केला.तेव्हापासून आजपर्यंत नगरपरिषदेवर प्रकाश धारिवाल यांची एकहाती सत्ता आहे.यातूनच शिरुरकरांचे धारीवाल कुटुंबीयांवर असलेले प्रेम अधोरेखित होते.समाजाभिमुख व निस्वार्थी राजकारण व शहराच्या विकासासाठी आवश्यक तेव्हा स्वनिधीचा वापर करणे या वैशिष्ट्यांमुळे धारीवाल यांनी शिरूरकरांचा विश्वास संपादन केला आहे.
नगरपरिषदेचा विकास साधत असताना नगरपरिषदेला कररूपाने मिळत असलेला निधी पुरेसा पडत नाही.विविध हेड खाली राज्य शासनाकडून नगरपरिषदेला निधी मिळवावा लागतो.देशातील नामवंत,दातृत्वसंपन्न उद्योगपती असल्याने धारीवाल कुटुंबियांचे विविध पक्ष तसेच सत्ताधिकाऱ्यांशी नेहमीच सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत.या संबंधांमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना निधी मिळण्यास कधीच अडचण भासली नाही.यातच धारीवाल यांना नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी २००९ पासून आमदार पवार यांची मोलाची साथ लाभत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार पवार व सभागृह नेते धारिवाल यांच्यावर विशेष मेहेरनजर असून या दोघांमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना भरघोस निधी मिळतानाचे वास्तव आहे.उदाहरणादाखल,नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतुक करताना पुढील विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.तात्पर्य शहराच्या विकासासाठी ही जोडी फायदेशीर ठरत आहे.
२०१९ ची निवडणूक जिंकल्यापासून आमदार पवार हे शिरूर शहरात पूर्वीपेक्षा लक्ष घालत आहेत,पवार यांचे शहरात येणे वाढले आहे.हे सत्य आहे.धारीवाल कुटुंबीयांशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे ते नगरपरिषदेच्या कामासंदर्भात माहितीही घेत असतात. मात्र याचा अर्थ ते नगर परिषदेच्या कामकाजात ढवळाढवळ करतात असे म्हणणे चुकीचे ठरेल.आमदार पवार यांनी शिरूर शहरात लक्ष घातले असेल,आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न करत असतील तर त्यात गैर असे काय? शिरूरकरांनी विधानसभा निवडणुकीत नेहमीच माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना साथ दिली आहे.मागील निवडणुकीत मात्र शिरूरकरांनी यास छेद देत आमदार पवार यांना साथ दिली.शिरूरकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी किंबहुना तो येथून पुढे कायम रहावा या उद्देशाने आमदार पवार शहरावर जास्त लक्ष केंद्रित करीत असावेत.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.नगरपरिषदेच्या राजकारणात धारीवाल यांना डावलून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार पवार करतील असे वाटत नाही.आणि जरी केला तरी त्यात ते कितपत यशस्वी होतील सांगता येणार नाही.याचे कारण शिरूरकरांनी नेहमीच धारीवाल कुटुंबीयांना साथ दिली आहे.शहरात कधीच कोणत्या पक्षाला नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकवता आलेला नाही.नगरपरिषदेच्या राजकारणात आतापर्यंत (काही अपवाद वगळता)’धारिवाल’हाच एकमेव पक्ष राहिलेला आहे.माजी आमदार पाचर्णे यांनी अनेकदा नगरपरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांनाही यश मिळू शकले नाही.मात्र पाचर्णे यांनी देखील आमदार असताना नगरपरिषदेच्या विकासासाठी सहकार्य केले आहे.
सर्वच पक्षाचे इच्छुक धारीवाल यांच्याच पॅनेलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करीत असतात.कारण धारीवाल यांच्या पॅनेलमधून उमेदवारी म्हणजे विजय निश्चित असे समीकरण बनलेले आहे. आगामी काळातही असेच चित्र पहावयास मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.एकूणच धारीवाल यांचे नगरपरिषदेवरील वर्चस्व मोडून काढणे वाटते तितके सोपे नाही.धारीवाल यांच्याशी असलेले घनिष्ट संबंध पाहता आमदार पवार धारीवाल यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावतील असे वाटत नाही.आमदार पवार व धारीवाल यांच्यात सख्य नसावे असे केवळ निनावी पत्रलेखकाचीच इच्छा आहे असे नाही.धारीवाल यांना मानणाऱ्या काही ठराविक मंडळीनाही दोघांमधील सख्य नको आहे.अर्थात या मुठभर मंडळीपेक्षा शिरुरकरांची काय इच्छा आहे.हे महत्त्वाचे आहे.