वाईट व समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यास शिरूरकर सक्षम- प्रकाश धारीवाल

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:शिरूरमधील समाजकारण व राजकारणाला एक वैचारिक अधिष्ठान आहे.इथे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील,वैचारिक वादळेही उठतील.मात्र कोणाला जीवे मारण्याची धमकी देणेइतपत वाईट विचार येथे कोणाच्याही मनात येत नाहीत.शहरात सर्वांच्या साथीने विकासरथाची घोडदौड सुरू आहे. या विकास रथाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे.अशा वाईट व समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यास शिरूरकर सक्षम आहेत.असा विश्वास सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी व्यक्त केला.
         दोन दिवसापूर्वी निनावीपत्राद्वारे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या पत्रात आमदार पवार हे नगरपरिषदेच्या कामकाजात ढवळाढवळ करतात.नगरपरिषदेचा राजकारणात धारीवाल यांना डावलून आपला दबदबा निर्माण करण्याचा त्यांचा छुपा प्रयत्न आहे. यामुळे सभागृहनेते धारीवाल यांनी आमदार पवार यांचे पासून सावध राहावे अशा आशयाचे लिखाण करण्यात आले आहे. या निनावी पत्राचा धारीवाल व त्यांच्या नगरपरिषदेतील सहकाऱ्यांनी समाचार घेतला.सोशल मीडियावर पत्र प्रसिद्ध करून त्यांनी खुलासा केला.धारीवाल म्हणाले आमदार अशोक पवार  व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे राजकारण व्यतिरिक्त जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचे नगरपरिषदेस वेळोवेळी सहकार्य लाभत असते.त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजात त्यांची ढवळाढवळ असते असा जावई शोध लावणाऱ्या मूर्खाच्या बुद्धीची आपणास कीव येते.शिरूर नगरपरिषदेच्या विकास कामासंदर्भात जिथे शासन स्तरावर सहकार्य लागते तिथे आमदार पवार तत्परतेने  हजर राहून कामे मार्गी लावतात.शहराच्या विकास कामांबाबत आमदार पवार व सुजताभाभी पवार या दांपत्याला आस्था असून ते कायम याबाबतची माहिती घेत असतात.याचा अर्थ ते नगरपरिषदेच्या कामकाजात ढवळाढवळ करतात असे नाही.
         निनावी पत्रात शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,आजी माजी नगरसेवक,कार्यकर्ते यांच्यावरही गरळ ओकण्यात आली आहे.धारीवाल यांनी या सर्वांवर विश्वास व्यक्त करताना,विकासकामांमध्ये या सर्वांबरोबरच प्रशासनाचे मोलाचे व प्रामाणिक योगदान अधोरेखित केले.शिरुकरांनी पिढ्यान् पिढ्या प्रेम दिल्याचा उल्लेख करताना या प्रेमातून उतराई होण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन शक्यातोपरी विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सर्वांच्या सहकार्याने घौडदौड करीत असलेल्या विकासरथाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न काही समाजंटकांकडून होत आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे असे प्रयत्न होत राहतील.मात्र शिरूरकर अशा वाईट व समाजविघातक प्रवृत्तींना ठेचण्यास सक्षम असल्याचा विश्वास धारीवाल यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.