रोहित्र चोरी करणाऱ्या रॅकेटच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर जरब बसवणार-पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:गेल्या एक ते दीड वर्षापासून पुणे जिल्ह्यातील विविध भागात इलेक्ट्रिक रोहित्र चोरी करणाऱ्या रॅकेटच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून या रोहित्रातील तांब्याचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार विक्रेते तसेच हे विक्रेते पुढे ज्यांना याची विक्री करतात अशा सर्वांवर कडक कारवाई करून असे गुन्हे पुन्हा घडू नयेत म्हणून त्यांच्यावर जरब बसवणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर,शिक्रापूर,दौंड,यवत तसेच रांजणगाव गणपती व इतर परिसरात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक रोहित्राच्या चोरीचे प्रकार घडत होते.या गुन्ह्याची उकल होण्यासाठी पोलीस अधीक्षक देशमुख यांच्या आदेशानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.या पथकाने अल्पावधीतच या गुन्ह्याचा छडा लावला. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशमुख म्हणाले रोहित्राच्या चोऱ्यांचे प्रकार ही साधारण बाब नसून या चोऱ्यांमुळे महावितरण,शेतकरीआणि एकूणच शासनाला याचा भुर्दंड बसत होता.भंगार विक्रेते या चोरट्यांना रोहित्र चोरीसाठी प्रथम रेकी करायला लावतात.यासाठी त्यांना वाहनेही पुरवतात. कट रचून होत असलेल्या अशा स्वरूपाच्या चोऱ्यांचे प्रकार वारंवार घडत होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाण्याचे निरीक्षक मांडगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अतिशय चांगली कामगिरी करत या गुन्ह्यातील रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये चोरी करणारे सचिन उर्फ गुल्ट्या सुभाष काळे,आकाश उर्फ गोट्या काळे,साहिल उर्फ नट्या शैलेश भोसले व एक अज्ञान तर चोरीचा माल विकत घेणारे भंगार विक्रेते उमेश यादव,गोविंद यादव, घरभरण यादव,करिमुल्ला मणियार व अक्रम रंगरेज अशा नऊ जणांना अटक करण्यात आल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.
इलेक्ट्रिक रोहित्र विषयी माहिती देताना देशमुख म्हणाले, यामध्ये ११ व २२ के व्ही चे रोहित्र महावितरण च्या वतीने बसविण्यात येतात. यात ११ के व्ही रोहित्रामध्ये ॲल्युमिनियम च्या पट्ट्या असतात. तर २२ के व्ही रोहित्रामध्ये तांब्याच्या पट्ट्या असतात. बाजारात तांब्याचे जास्त पैसे येत असल्याने २२ के व्ही रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे.यामुळे ॲल्युमिनियम पट्ट्या असणाऱ्या रोहित्र बसविण्यास प्राधान्य द्यावे याबाबत महावितरणला सूचना करण्यात आल्या असून महावितरणनही यावर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. तरीही रोहित चोरीच्या घटना पुढे घडू नयेत म्हणून भंगार विक्रेते व ते पुढे ज्यांना विक्री करतात अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करून ही साखळी तोडण्याचा प्रयत्न असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
आरोपींनी नऊ गुन्ह्यांची कबुली दिली असून रांजणगाव खंडाळे,गणेगाव खालसा,कर्डेलवाडी,निमगाव भोगी कारेगाव व खंडाळी माथा येथील नऊ रोहित्रा चोरीच्या गुन्ह्यातील एकूण ४२६ किलोग्रम वजनाच्या २ लाख ९८ हजार २०० रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व पट्ट्या, तीन लाख रुपये किमतीची वाहने असा एकूण मिळून ५ लाख ९८ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक सुहास रोकडे,पोलीस हवालदार विजय सर्जिने, संतोष औटी, विलास आंबेकर, वैजनाथ नागरगोजे,पोलीस नाईक विजय शिंदे,उमेश कुतवळ, रघुनाथ हाळनोर, वैभव मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग साबळे या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.