विद्याधाम प्राथमिक शाळेचा यशस्वी ‘ऑनलाइन’पॅटर्न

विद्यार्थी व पालक समाधानी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत.ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले जात आहेत.ऑनलाईन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना तसेच पालकांना फारशी रुचलेली नाही. अशात येथील विद्याधाम प्राथमिक शाळेने वैविध्य व नाविन्यपूर्ण तसेच आनंददायी शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून आदर्शवत असा ऑनलाइन पॅटर्न यशस्वी  करून दाखवला आहे.

कोरोना महामारीमुळे  गेल्या मार्चपासून शाळा व महाविद्यालय सुरू करता आली नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत.ऑनलाईन शिक्षण पद्धती चांगली अथवा वाईट,विद्यार्थ्यांना भावते अथवा नाही याबाबत मतमतांतरे आहेत.अर्थातच ऑफलाइन शिक्षण पद्धती ही ऑनलाइन शिक्षण पद्धतीपेक्षा निश्चितच फायदेशीर आहे.असेच बहुतांशी विद्यार्थी व पालकांचे मत आहे. येथील शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्राथमिक शाळेने मात्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे आव्हान स्वीकारून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम  शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याबाबत विद्यार्थी  तसेच पालक समाधानी असल्याचे चित्र आहे.

विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी सर्व शिक्षकांची बैठक घेऊन ऑनलाइन शिक्षण पद्धती यशस्वी करण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षिकांनीही यास उत्तम प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी करण्याचा संकल्प सोडला.ऑफलाइन शिक्षण देताना शाळेचा ज्या पद्धतीचा दिनक्रम होता त्या पद्धतीनेच ऑनलाइन शाळा घेण्यात येत आहे. शाळा ऑनलाइन असली तरी प्रार्थना राष्ट्रगीत,बोधकथा तसेच सुविचारा पासून शाळेची सुरुवात केली जात आहे.  ऑनलाइन शिक्षण देताना विषयवार वर्ग घेतले जातातच. विद्याधाम प्राथमिक शाळेने मात्र याबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रमाची याला जोड दिली आहे.यात सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे तो ऑनलाईन क्षेत्रभेट.या उपक्रमांतर्गत  तरडोबाचीवाडी येथील शिवतारा पर्यटन स्थळाला भेट देण्यात आली.या ठिकाणी असणारे औषधी वनस्पती फळे,फुले,झाडे,प्राणी,पक्षी तसेच पर्यटन विषयक इतर विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.

विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या बी बियाणां संदर्भात माहिती मिळावी म्हणून येथील बियाणांच्या दुकानास भेट देण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक भटेवरा यांना विविध प्रश्न विचारले. यास भटेवरांनी दिलखुलासपणे उत्तरे देताना बियाणांचा संग्रह करण्यास सांगितले.पोस्ट कार्यालय भेटीवेळी या कार्यालयातील कामकाज तसेच पासपोर्ट विषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.पोस्ट मास्तर अमोल साळवे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन यावेळी केले..जागतिक आरोग्य दिनी येथील माऊली मेडिकलला भेट देण्यात आली. यावेळी मेडिकलचे संचालक माऊली येणारे यांनी औषध शास्त्र विषयी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची तसेच संवेदनशीलतेची जोपासना व्हावी यासाठी येथील गोकुळ वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी तेथील आजोबा आजींशी मुक्त संवाद साधला.येथील ओंकार संगीत विद्यालयास भेट दिली असता संगीत शिक्षक गणेश मराठे यांनी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाविषयी माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये सैनिक तसेच राष्ट्राविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने ज्ञानेश्वर मापारी तसेच झंझाड या माजी सैनिकांची मुलाखत विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देण्यात आली.याबरोबरच नर्सरी,कुक्कुटपालन,कुंभार काम,कापड व्यवसाय आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन भेट घडविण्यात आली.

सर्वात महत्वाचे म्हणजे,या शाळेत प्रत्येक आठवड्याला दोन विषयांच्या ऑनलाईन परीक्षाही घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका घरी सोडवण्यासाठी दिल्या जात आहेत.यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाची व्यवस्थितरीत्या तयारी करून घेता येत आहे.वक्तृत्व,चित्रकला,नाट्यवाचन  कविता वाचन आदी प्रकारच्या ऑनलाइन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे.एकूणच मुख्याध्यापिका मुळे यांच्यासह त्यांचे सहकारी शिक्षिका यांची विद्यार्थ्यांप्रती असलेली समर्पक भावना यातून स्पष्ट होते. या भावनेमुळे या शाळेने आनंददायी ऑनलाइन शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.

          शाळेच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका मुळे म्हणाल्या, शाळेचे अध्यक्ष सुकुमार बोरा तसेच शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.यास विद्यार्थी तसेच पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून हे आमच्या शाळेचे यश आहे.बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन,सौजन्यशीलता,स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा,राष्ट्रभक्ती तसेच राष्ट्रीय एकात्मता आदी मूल्य रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. दरवर्षी आमच्या शाळेत आषाढी एकादशीच्या वेळी सुंदर अशा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. दोन वर्षापासून मात्र विद्यार्थी यास मुकले आहेत.तरीही विद्यार्थ्यांना या सोहळ्याचा आनंद मिळावा म्हणून आमच्या सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पालखी सोहळ्याचे दर्शन घडवले. शिक्षिकांनीच अभंग गाऊन अभंगावर नृत्य सादर केल्याचे मुख्याध्यापिका मुळे यांनी सांगितले. एकूणच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वैविध्यपूर्ण तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली असून पालकही याविषयी समाधान व्यक्त करीत आहेत.याचे आम्हाला समाधान असल्याचेही मुळे म्हणाल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.