विद्यमान खासदाराकडून माजी खासदाराच्या कृतीचे अनुकरण?
शिरूर तालुक्याकडे विद्यमान खासदाराचे कमी लक्ष असल्याचा होतोय आरोप
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर: शिरूर लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदाराच्या कृतीचे विद्यमान खासदार अनुकरण करीत आहेत की काय?असा अलीकडील काही घटनांवरून प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.माजी खासदाराने तालुक्याचा दौरा सुरू केल्यानंतर आठवडाभरातच विद्यमान खासदारांचाही दौरा सुरू झाला आहे.विद्यमान खासदाराचे शिरूर तालुक्याकडे लक्ष कमी असल्याचाही आरोप होतोय.
२००८ साली पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ मतदार संघाचे नाव बदलून शिरूर लोकसभा मतदारसंघ करण्यात आले.या मतदारसंघात शिरूर हवेली,खेड, आंबेगाव,जुन्नर,हडपसर,भोसरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.नव्या नावाने निर्माण झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. मागील लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे विजयी झाले. निवडून आल्यापासून आजपर्यंतची परिस्थिती पाहता विद्यमान खासदार कोल्हे फार कमी वेळा शिरूर तालुक्यात आले असावेत.कोल्हे यांची शिरूर तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याची टीकाही होत असते.मागील वर्षी सर्वत्रच कोरोनाच्या महामारीने शिरकाव केला.तेव्हापासून आजपर्यंत तालुक्यात २५ हजाराहून अधिक रुग्ण बाधित झाले तर ४०० रुग्णांचा मृत्यू झाला.पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.ऑक्सिजन,व्हेंटिलेटर बेड अभावी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले.अशा परिस्थितीत शिरूर-हवेलीतील नागरिकांना खासदारांकडून काही अपेक्षा होत्या.खासदार साहेब मात्र शिरूर हवेली मतदारसंघात फिरकण्यास फारसे उत्सुक नव्हते.त्यांच्याकडून अपेक्षित मदत मिळू शकली नाही.मागील वर्षी (२०२०)शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख यांनी खासदार साहेब शिरूर-हवेली कडेही लक्ष द्या.. असे आवाहन केले होते.त्यानंतर काही महिन्यांनी खासदार कोल्हे शिरूर मध्ये आले होते.त्यानंतर पुन्हा क्वचितच त्यांचे दर्शन झाले.एप्रिल महिन्यामध्ये (२०२१)माजी खासदार आढळराव पाटील यांनी शिरूरमध्ये येऊन कोविड केअर सेंटरला भेट दिली होती.यावेळी त्यांनी,कोरोना वैद्यकीय सेवेसंदर्भात इतर तालुक्याच्या तुलनेत शिरुरमध्ये खूप कमी सुविधा असल्याची खंत व्यक्त केली होती.शिरूर ग्रामीण रुग्णालयात केवळ ३० बेड असल्याबद्दल आढळराव पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करताना शिरूरसारख्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
माजी खासदार आढळराव पाटील यांच्या या आश्वासनानंतर काही दिवसातच विद्यमान खासदारांनी देखील शिरूर येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात सुतोवाच केले.तशी मागणीही त्यांनी केली.मागील आठवड्यात आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्याच्या दौऱ्यास सुरुवात केली.यावेळी पत्रकारांशी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी,मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मतदार संघाचा दौरा नियोजन केल्याचे स्पष्ट केले होते.टप्प्याटप्प्याने मतदारसंघात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.यानंतर आठवडाभरातच विद्यमान खासदार कोल्हे यांच्या दौऱ्याचे नियोजन झाल्याचे दिसून येत आहे.वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन कोल्हे यांनी दौऱ्याची सुरुवात केली.या घटना पाहता कोल्हे माजी खासदाराच्या कृतीचे अनुकरण तर करीत नाहीतना असा प्रश्न पडतो..ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले,नागरिक त्यांच्याकडूनच जास्त अपेक्षा ठेवत असतात.मात्र कोल्हे यांचे शिरूर तालुक्याकडे लक्षच नसल्याने नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा ठेवाव्यात हा देखील प्रश्न आहे.अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.एवढेच नव्हे तर नागरिकांमध्येही याबाबत कुजबुज आहे.
कोल्हे यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.याचा शिरूरकरांनाही अभिमान आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघायील इतर भागात कोल्हे यांचे काम चांगले असेलही.त्यांनी शिरूर तालुक्याकडेही तितकेच आत्मीयतेने पहावे एवढीच शिरूरकरांची अपेक्षा आहे.त्यांनी तालुक्याचा दौरा सुरू केला ही समाधानाची बाब आहे.येथून पुढे शिरूरकडे ते प्राधान्याने लक्ष देतील.अशी आशा बाळगुया.