सिद्धेश्वर टेकडीवरील झाडांची अज्ञातांकडून कत्तल

सिद्धेश्वर वनीकरण समितीने केला तीव्र निषेध

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:शहरातील वृक्षप्रेमींनी वृक्षारोपण व त्याचे जतन करण्यासाठी दत्तक घेतलेल्या सिद्धेश्वर टेकडीवरील  मोठ्या कष्टाने संवर्धन केलेल्या शंभरहून अधिक झाडांची अज्ञात व्यक्तींकडून कत्तल करण्यात आली आहे. वृक्ष कत्तल करणाऱ्या या नकारात्मक प्रवृत्तीचा सिद्धेश्वर समितीने निषेध केला असून याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून या टेकडीवर  गस्त घालण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

        शहरात वनविभागाची ८० एकर क्षेत्र असणारी सिद्धेश्वर वनीकरण टेकडी आहे.तीन वर्षांपूर्वी ही टेकडी पूर्णतःओसाड होती.या भागात शहरातील अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात.ही ओसाड टेकडी हिरवीगार करण्याची संकल्पना फिरण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांच्या मनात आली.यातूनच वृक्षारोपणाची सुरुवात झाली. आपण पाहतो वृक्षारोपण केले जाते, त्याचे फोटो सेशनही होते मात्र पुढे त्याचे संवर्धन होताना दिसत नाही.या टेकडीवरचे चित्र मात्र आशादायक असे आहे. वृक्षारोपण करण्याच्या निमित्ताने हळूहळू शहरातील वृक्षप्रेमींचा ग्रुप तयार झाला.यातूनच सिद्धेश्वर वनीकरण समितीची स्थापना झाली.या समितीच्या सदस्यांनी केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला.हळूहळू झाडांची संख्या वाढू लागली.दररोज सकाळी व संध्याकाळी समितीची सदस्य टेकडीवर येऊन झाडांची नित्यनेमाने काळजी घेऊ लागले. वृक्ष प्रेमींच्या या समर्पकतेमुळे एकेकाळी ओसाड दिसणारी सिद्धेश्वर टेकडी हळूहळू हिरवीगार दिसायला लागली.गेल्या तीन वर्षांची परिस्थिती पाहता सिद्धेश्वर वनीकरण समितीच्या सदस्यांनी या टेकडीवर पाच हजार झाडे लावल्याचे आशादायक चित्र आहे.सध्याचे चित्र पाहता या टेकडीने जणू काही हिरवा शालू पांघरला आहे असे दिसून येते.
          एवढ्या आत्मीयतेने जोपासलेल्या या झाडांना जणू कोणाची नजर लागली.गेल्या सहा महिन्यापासून या टेकडीवरील झाडांची कत्तल होऊ लागली. झाडांची कत्तल होऊ लागल्याने समितीचे सदस्य अस्वस्थ होऊ लागले.रात्रीच्या अंधारात कोण कत्तल करीत आहे याचा त्यांना थांगपत्ताही लागेना. गेल्या सहा महिन्यात वड पिंपळ तसेच उंबर या प्रकारची शंभराहून अधिक झाडांची कत्तल झाली आहे.हा प्रकार अतिशय क्लेशदायक असून समितीच्या सदस्यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात आज समितीच्या सदस्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन झाडांची कत्तल करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच या टेकडीवर सकाळी व रात्री गस्त घालण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.समितीचे सदस्य तुषार वेताळ,संतोष साळी, डॉक्टर सुरेंद्र डोंगरे डॉक्टर अतुल कुमार बेद्रे योगेश देशमुख लक्ष्मण डोके बाळासाहेब थेटे राज पारखे अमोल शिंदे पत्रकार मुकुंद ढोबळे भगवान श्री मंदिलकर आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी निवेदन स्वीकारले.

Leave A Reply

Your email address will not be published.