महिला डॉक्टर व त्यांची टीम ठरली कोरोना रुग्णांची तारणहार
सामूहिक प्रयत्नातून हे सर्व शक्य-डॉ.नीलम गणेश बडे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:येथील चां.ता. बोरा महाविद्यालयातील कोविड केअर सेन्टर्समध्ये दोन महिन्यात पाचशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून दहापर्यंत स्कोर असणाऱ्या रुग्णांचाही यात समावेश आहेे हे विशेष.या सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ.नीलम गणेश बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी झोकून देऊन रुग्णांची सेवा केल्याने ते या रुग्णांचे तारणहार बनले आहेत.
रुग्णसंख्या वाढत गेल्याने एप्रिल मध्ये येथील बोरा महाविद्यालयाच्या स्त्री व पुरुष वसतिगृहात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये शहर व तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र होते. रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते.लक्षणे आढळली, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तसेच एच आर सिटीस्कॅनचा स्कोर पाच व त्यावर आल्यास रुग्णांची बेड मिळवण्यासाठी ससेहोलपट होताना चित्र होते.अशात ऑक्सिजन बेड न मिळाल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.बेड मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.बेड मिळाला तरी खासगी रुग्णालयांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा होता.अशात बोरा महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरने सर्वसामान्यांना मोठा आधार दिला.या सेंटरमध्ये पाच पर्यंत एच आर सिटी स्कॅन स्कोर असणाऱ्या रुग्णांनाच दाखल करून घेतले जात होते.मात्र स्कोर दहापर्यंत आहे आणि इतरत्र कुठे बेड मिळत नाही.अथवा बेड मिळाला तरी त्याचा खर्च पेलवणे शक्य नाही.असे रुग्ण बोरा महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड
केअर सेंटरचे दरवाजे ठोठावत होते.अशा कठीण प्रसंगात डॉ.बडे यांनी प्रसंगावधान दाखवून तसेच खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन अशा रुग्णांना देखील दाखल करून घेण्याचे धारिष्ट्य दाखवले.डॉ.बडे यांच्या प्रसंगावधानामुळे दहा पर्यंत स्कोर असणाऱ्या
पंधरा रुग्णांना या सेंटर मध्ये जीवदान मिळू शकले.
याबाबत शिरूरनामाशी बोलताना डॉ.बडे म्हणाल्या, एप्रिल महिन्यामध्ये दररोज सत्तर ते ऐंशी रूग्ण आमच्या सेंटर मध्ये दाखल होत होते.या कालावधीमध्ये रुग्णांना बेड मिळणे दुरापास्त झाले होते.आम्हाला पाच पर्यंत स्कोर असणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेण्याची परवानगी होती.मात्र दहा पर्यंत स्कोर असणाऱ्या अनेक रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी,काही करून दाखल करून घेण्याची कळकळीची विनंती केल्याने आम्ही अशा रुग्णांना दाखल करून घेण्याचे धाडस केले.या रुग्णांवर उपचार करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोरे व डॉ.संदीप तरटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.डॉ.तरटे यांचे योग्य मार्गदर्शन व आमच्यातील उत्तम समन्वययामुळे असे रुग्ण बरे होऊ शकले.विशेष म्हणजे पाच ते दहा पर्यंत स्कोर असलेले सर्व रुग्ण हे ऑक्सिजन व रेमडेसिविरच्या वापराविना बरे झाले याचा आनंद असल्याचे डॉ.बडे म्हणाल्या.दाखल रुग्णांपैकी ५३० रुग्ण ठणठणीत बरे झाले याचे समाधान असून यामध्ये माझ्या सहकारी सिस्टर्स,वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक दातृत्व संपन्न व्यक्ती,समाजसेवी संघटना यांनी सेंटरला मोलाची मदत केली.आमदार ॲड.अशोक पवार व सुजाता पवार यांनी आम्हाला आवश्यक ते वैद्यकीय साहित्य तसेच रुग्णांना भोजन देऊन मोलाचे सहकार्य केले.
दाखल रुग्णांपैकी अनेक रुग्णांना फॅबिफ्ल्यू
या गोळ्यांची आवश्यकता होती.ग्रामीण रुग्णालय तसेच प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी या गोळ्या उपलब्ध करून दिल्याने अनेक रुग्णांना याचा फायदा झाला.एकूणच विविध व्यक्ती,संस्था,संघटना यांचे सहकार्य तसेच आमचा संपूर्ण स्टाफ यांनी घेतलेली मेहनत यामुळे पाचशेहून अधिक रुग्ण बरे होऊ शकले.याचे समाधान असल्याचे डॉ.बढे म्हणाल्या.
डॉ.बडे- मानसिक कणखरतेमुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो.कोविड केअर सेंटरमध्ये असणारे सकारात्मक व कौटुंबिक वातावरण यामुळे रुग्णांची मानसिक कणखरता वाढण्यास मदत झाली.परिणामी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले.