ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा राजीनामा

राजीनामापत्र निकाली काढल्याची जिल्हा शल्यचिकित्सकाची माहिती

0

शिरूर:ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा  दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सध्या फक्त एका मेडिकल ऑफिसरच्या जीवावर शिरूर ग्रामीण रुग्णालयची धुरा आहे.जिल्हा शल्यचिकित्सलयाच्या स्तरावर राजीनाम्याबाबत कार्यवाही होत नसल्याने त्यांचे राजीनामापत्र निकाली काढल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनी शिरूरनामाशी बोलताना सांगितले.

         डॉ.पाटील यांच्याकडे गेली वर्षभरापासून वैद्यकीय अधीक्षकपदाचा पदभार होता.मात्र वैयक्तिक कारणास्तव डॉ.पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.एक महिन्यापूर्वी याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठवले.एक जून रोजी त्यांनी पदभार सोडला.यास आठवडा उलटलातरी अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड आरोग्य सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.शहरातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी देखील या रुग्णालयावर आहे. कोरोनाची आर टी पी सी आर व अँटिजेन टेस्ट देखील या रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली केल्या जात आहेत.अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकानेच  राजीनामा दिल्याने सध्या या रुग्णालयाची यंत्रणा रामभरोसेच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक,तीन वैद्यकीय अधिकारी रुजूूूू असणे अपेक्षित आहे.मात्र या रुग्णालयात दोनच वैद्यकीय अधिकारी आहेत. गेली तीन वर्षापासून वैद्यकीय अधीक्षकपद रिकामे आहे.डॉक्टर नकाते यांच्या निवृत्तीनंतर हे पद भरण्यात आले नाही.डॉ.पाटील हे वैद्यकीय अधिकारी होते.त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा तात्पुरता पदभार होता.पाटील यांनी पदभार सोडल्यानंतर आता एकच वैद्यकीय अधिकारी आहे.
           सध्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत असली तरी परिस्थिती संपूर्ण निवळली नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय सर्व बाबतीत सुसज्ज असणे गरजेचे आहे.कोरोनाच्या सध्याच्या संकटमय कालावधीमध्ये महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या ग्रामीण रुग्णालयात मुख्य पदच रिक्त असणे संयुक्तिक ठरणार नाही. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने याबाबत तातडीने पावले उचलून निर्णय घेणे अपेक्षित आहे. डॉ.पाटील यांच्या राजीनाम्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नांदापूरकर यांच्याशी संपर्क साधला असता,ते म्हणाले,डॉ.पाटील यांचे राजीनामापत्र मिळाले.मात्र जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या स्तरावर राजीनाम्याबाबत कार्यवाही होत नसल्याने त्यांचे राजीनामापत्र निकाली काढण्यात आले आहे.पर्यायी व्यवस्थेबाबत मात्र नांदापूरकर यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.