प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा नियोजनबद्ध विकास-आमदार अशोक पवार
शिरुर शहर विकास आघाडीचा विकास हाच एकमेव अजेंडा-धारीवाल
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरुर शहराचा नियोजनबद्ध विकास होत असून धारिवाल हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत असे गौरवोद्गार आमदार अशोक पवार यांनी येथे काढले.
शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावरील पाबळ फाटा ते तहसील कार्यालय या टप्प्याच्या पाच कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार ॲड.अशोक पवार,सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रकारांशी वार्तालाप करताना आमदार अशोक पवार यांनी गौरवोद्गार काढले.ते म्हणाले,धारीवाल यांच्यामध्ये विकासाची दूरदृष्टी असून वेळ पडल्यास विकास कामांसाठी ते स्वनिधीचाही वापर करीत असतात. यातूनच त्यांची शहराच्या विकासाप्रती असलेली आस्था दिसून येते.सभागृह नेते धारीवाल यांनी यावेळी शहरातील विकास कामांबद्दल माहिती दिली.पाषाण मळा ते सतरा कमानीचा पूल हा शहरातून जाणारा जुना पुणे नगर रस्ता आहे.या संपूर्ण रस्त्याचे टप्प्याटप्प्याने काम होणार असून पहिल्या टप्प्यात पाबळ फाटा ते तहसीलदार कार्यालय असे पाच कोटी रुपयांचे काम केले जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यात पाबळ फाटा ते पाषाण मळा तर तिसरे टप्प्यात जोशीवाडी ते सतरा कमानीचा पूल या रस्त्याचे काम केले जाणार आहे.या संपूर्ण रस्त्याचे एस्टिमेट पंधरा कोटी रुपयांपर्यंत असून नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे.आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाल्याचे धारीवाल यांनी सांगितले.शहरातील विविध भागात तीन कोटी रुपये खर्चाची रस्त्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.तीन कोटी रुपये खर्चाची एलईडी पथदिव्यांची कामही प्रगतीपथावर असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.शिरुर शहर विकास आघाडीचा विकास हाच एकमेव अजेंडा असून त्या दृष्टिकोनातून आघाडीची यशस्वीरित्या वाटचाल सुरू असल्याचा विश्वास नगराध्यक्षा वाखारे यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित उपस्थितीतच भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार,शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,काँग्रेसचे अध्यक्ष किरण आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.