शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:कोरोनामुळे शहर व तालुक्यात ५६ तरुणांचे बळी गेले असून तरुणांचे बळी जात असल्याने अनेक बालकांचे छत्र हरपले आहे तर अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.कोरोनाची लक्षणे दिसत असतानाही आजार अंगावर काढणे,त्याकडे दुर्लक्ष करणे यामुळे तरुणांसह इतरांचाही मृत्यू होत असल्याचे मानले जात आहे.नागरिकांनी विशेषतः तरुणांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मागील फेब्रुवारीमध्ये देशात कोरोनाचा शिरकाव झाला.मागीलवर्षापासून आजपर्यंत शहर व तालुक्यात एकूण मिळून २३८९४ रुग्ण आढळून आले आहेत.३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.ऑक्टोबर २०२० नंतर कोरोनाची लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच फेब्रुवारी २०२१ पासून शहर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले.मागील वर्षाची(२०२०)परिस्थिती पाहता शहर व तालुक्यात कोरोनामुळे जे मृत्यू झाले, त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती.चालू वर्षात कोरोनाची परिस्थिती पाहता मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे चित्र असून यामध्ये तरुण रुग्णांचा समावेश आहे.फेब्रुवारी ते मार्च(२०२१)या कालावधीत शहर व तालुक्यात रुग्णांना ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड मिळले दुरापास्त झाले होते.मोठ्या शहरातही बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत होती.अशा बेड अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले.सध्या परिस्थिती सामान्य झाली नसलीतरी लॉकडाऊन लागू केल्यापासून हळूहळू शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे.
परिस्थिती काहीशी सामान्य होत चालली असली तरी कोरोना मुळे तरुणांचे होत असलेले मृत्यू चिंताजनक आहेत.शहर व तालुक्यात आतापर्यंत ३७५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.यात १८ ते ४५ या वयोगटातील ५६ जणांचा समावेश आहे. ४६ ते ६० या वयोगटातील १०१ तर ६० वर्ष वयोगटा पुढील २१८ रुग्णांचा समावेश आहे.५६ तरुणांचे मृत्यू ही निश्चितच गंभीर बाब म्हणावी लागेल.चालू वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर दुपटीने वाढला असून या लाटेत तरुण रुग्ण मोठ्या प्रमाणावर दगावल्याचे वास्तव आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण व प्रौढ व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असते.असे असतानाही ५६ तरुणांचे प्राण गेले आहेत.यामध्ये वैद्यकीय कारण असलेतरी बहुतांशी केसेस मध्ये तरुणांचा निष्काळजीपणा यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.कोरोनाची जी लक्षणे सांगण्यात आली आहेत,ती लक्षणे दिसत असतानाही अनेक तरुणांनी ते गांभीर्याने न घेता मला काहीच होऊ शकत नाही या अविर्भावात,आजार अंगावर काढण्याची चूक केल्याचे बोलले जात आहे.वास्तविक पाहता लक्षणे दिसताच त्वरित कोरोनाची तपासणी करणे आवश्यक आहे.वेळेत तपासणी केल्यास तसेच त्वरित उपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होतो.असा अनुभव आहे.शहर व तालुक्यात २३,८९४ कोरोना बाधित आढळून आले असले तरी २१,९३७ रुग्ण बरे झाले आहेत.ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.एकूण बाधित व बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाहता, वेळेत निदान व उपचार केल्यास कोरोनावर मात करता येऊ शकते हेच सिद्ध होते.लक्षणे दिसताच तपासणी करणे व त्वरित उपचार करणे याकडे नागरिकांनी विशेषत: तरुणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मृत तरुणांमध्ये अनेक विवाहित तर अनेक अविवाहित तरुण आहेत.विवाहित तरुणांची पत्नी विधवा झाली असून लहान मुलांच्या डोक्यावरचे बापाचे छत्र हरपले आहे.अविवाहित तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. या तरुणांच्या आईबापाचा आधार हरपला आहे.म्हातारपणात आधार हरपल्याने त्यांचे जीवन अंध:कारमय झाले आहे.तरुणांच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.