शिरूर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी ठोस कृती व अंमलबजावणीची गरज

0
                       शिरूर वार्तापत्र
प्रवीण गायकवाड
शिरूर:शहर कोरोनामुक्त करण्यासाठी  लोकप्रतिनिधी,महसूल,पोलीस,आरोग्य व नगरपरिषद प्रशासन यांच्यातील समन्वयाबरोबर ठोस कृती व  त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.रुग्णसंख्या वाढण्यास जी महत्त्वाचे कारणे आहेत त्यावर मंथन होऊन त्यावर गांभीर्याने काम करणेही गरजेचे आहे.
         मागील वर्षी देशात सर्वत्र कोरोना लाट पसरली. शिरूर शहरात जूनमध्ये पहिला रुग्ण सापडला.त्यानंतर साधारण महिन्याला सरासरी ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. या पहिल्या लाटेत शिरूर शहरात एकूण मिळून ७८० रुग्ण सापडले तर २१ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असे वाटत असतानाच चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्ण सापडू लागले.१ फेब्रुवारीपासून आजपर्यंतची परिस्थिती पाहता शासकीय आकडेवारीनुसार,शहरात १५४८ रुग्ण आढळून आले आहेत.२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मागीलवर्षी मागासवर्गीय मुलींचे हॉस्टेलमध्ये कोरोना आर टी पी सी आर तर ग्रामीण रुग्णालयात अँटीजेन तपासणी केली जात होती.कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर शहरातील आर टी पी सी आर तपासणी केंद्र बंद करण्यात आले.ते अद्याप बंदच आहे.चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून शहरात पुन्हा नव्याने रुग्ण आढळू लागले.फेब्रुवारी ते मे पर्यंत ची परिस्थिती पाहता मागील वर्षाच्या तुलनेत रुग्ण संख्या दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.अशी परिस्थिती असताना देखील शहरात आर टी पी सी आर तपासणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले नाही.रुग्णांना कारेगाव तसेच मलठण येथे जाऊन तपासणी करावी लागत आहे.शहरात आर टी पी सी आर तपासणीचे केंद्र नसल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक खाजगी लॅब मध्ये तपासणी करीत असल्याचे समोर आले आहे.ग्रामीण रुग्णालयातील एकाच केंद्रावर अँटीजेन टेस्ट केली जात असल्याने बरेचशे नागरिक ही टेस्ट देखील खाजगी लॅबमध्ये करीत आहे.ज्यांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली,अशा रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडे नाही.यामुळे शहरातील रुग्णांचा खरा आकडा हा समोर येऊ शकलेला नाही.
          खाजगी लॅबमध्ये तपासणी करायची व परस्पर एखाद्या दवाखान्यात अथवा फॅमिली डॉक्टरला घरी  बोलवून उपचार घ्यायचे.या प्रकारामुळे शासनाला अशा बाधितांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.परिणामी अशा रुग्णांवर आरोग्य विभागाला नियंत्रण ठेवता आले नाही.वास्तविक पाहता कोरोना बाधित रुग्णाने उपचार घेतल्यानंतर देखील १४ दिवस पूर्ण होईपर्यंत इतरांच्या संपर्कात आले नाही पाहिजे.(क्वारंटाइन राहिले पाहिजे.) मात्र खाजगी लॅबमध्ये तपासणी करून बाधित आढळलेल्या अनेक रुग्णांनी असे नियम पाळले नसल्याचे दिसून आले आहे.हेच रुग्ण सुपर स्प्रेडर ठरले आहेत.आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.लॉकडाऊन मुळे बाधितांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी रुग्ण सापडणे बंद झालेले नाही.परिस्थिती अजूनही  नियंत्रणात नाही.यातच तिसरी लाट येण्याचे संकेत मिळाले आहेत.अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने शहरात कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून सुपर स्प्रेडरवर अंकुश ठेवण्यासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे.शहरात तातडीने आर टी पी सी आर तपासणी केंद्र सुरू करणे, विनाखंडित अँटीजेन तपासणी सुरू ठेवणे(मागे काही दिवस ही तपासणी देखील बंद होती) आदी गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचीही गरज आहे.शक्य झाल्यास अशा केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे.आरोग्य प्रशासनालाते शक्य नसेलतर खरी आकडेवारी समजण्यासाठी त्यांनी खाजगी लॅबला अधिकृत तपासणीची परवानगी द्यायला हवी.संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी तसेच शहर कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाबरोबरच लोकप्रतिनिधी,महसूल,पोलिस व नगरपरिषद प्रशासन यांच्यातील समन्वयाबरोबर ठोस कृती व त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. नागरिकांनीही प्रामाणिक साथ देणे गरजेचे आहे.
          शिरूर शहरात सध्या तालुका आरोग्य विभागाच्या इमारतीत एकाच ठिकाणी दोन्ही वयोगटाच्या नागरिकांना लस दिली जात आहे.रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे शिरुर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.दोन्ही वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी शहरात प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू केल्यास गर्दीवर नियंत्रण राहून सर्व नागरिकांना लस मिळू शकणार आहे.आरोग्य विभागाने याप्रकारे नियोजन करायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.