शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मोह,मायेचा त्याग करून आपले आयुष्य उपेक्षित घटकांसाठी व्यतीत करणाऱ्या येथील शासकीय विशेष मुलींच्या वसतिगृहातील सिस्टर सुमा या ‘देवदुताचा’ कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला.
२५ एप्रिलला शासकीय विशेषत मुलींच्या वसतिगृहातील ५७ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. यात ४८ मुली व ९ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.संस्थेच्या अधीक्षिका सिस्टर डोमिनी व सिस्टर सुमा याही बाधित झाल्या होत्या.या दोघींना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.२ मे रोजी सिस्टर डोमिनी व सुमा यांना अंधेरी,मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.सुमा यांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.त्यांनी दहा दिवस मृत्यूशी झुंज दिली.मात्र ही झुंज अपयशी ठरली.१२ मे रोजी सुमा यांची प्राणज्योत मालवली.१९९७ सालापासून वर्धा येथील,उपेक्षित घटकांच्या उद्धाराचे व्रत स्विकारलेली
‘कर्मोलोदया’ ही संस्था विशेष मुलींचे वसतिगृह चालवत आहेत. सिस्टर डोमिनी या सुरुवातीपासून या वसतिगृहात कार्यरत असून २०१३ साली सिस्टर सुमा या वसतिगृहात सेवेसाठी दाखल झाल्या.तीन वर्ष काम केेेल्या नंतर त्यांची मुख्यालयात बदली झाली होती.२०१८ ला पुन्हा त्या येथील वसतिगृहात रुजू झाल्या होत्या.अतिशय मितभाषी असणाऱ्या सुमा सिस्टर या विशेष मुलींची विशेष अशी काळजी घेत होत्या.मुलींनाही त्यांची सवय झाली होती.सेवाभाव जपनाऱ्या देवदुताचा अशाप्रकारे अंत होणे दुर्दैवी म्हणावे लागेल.या विशेष मुलींना आपला देवदूत कुठे गेला हे कदाचित कळणार नाही…मात्र त्यांचे डोळे कायम या देवदूताचा शोध घेत राहतील….