शिरुरच्या स्थानिक नागरिकांसाठी लसीचा कोटा आरक्षित ठेवा

शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची आरोग्य विभागाकडे मागणी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: केंद्र सरकारने लसीकरणासाठी बंधनकारक केलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया स्थानिक नागरिकांसाठी अडचणीची ठरत असून यामुळे ते लसीकरणापासून वंचित राहत आहे.ऑनलाईन नोंदणीचा आग्रह न धरता स्थानिकांसाठी स्वतंत्र लसीकरण यंत्रणा सुरू करावी अथवा स्वतंत्र कोटा आरक्षित ठेवावा अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकाकडे करण्यात आली.
         सध्या १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.लसीकरणासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.ऑनलाइन प्रक्रिया सर्वच नागरिकांना अवगत असेल असे नाही. याचप्रमाणे नागरिक ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायचा प्रयत्न करतात त्यांना विविध प्रकारचे अडथळे येत आहेत. शहरातील अनेक तरुणांच्या याबाबत तक्रारी आहेत.परिणामी त्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. कोरोनाच्या महामारीपासून संरक्षण मिळण्यासाठी सर्वांना लस मिळावी हे शासनाचे धोरण आहे.याच अनुषंगाने सर्वत्र लसीकरण सुरू आहे. शिरूर मध्ये देखील लसीकरण सुरू आहे.मात्र गेल्या दोन दिवसातील परिस्थिती पाहता लसीकरण केंद्रावर स्थानिकां ऐवजी बाहेरील नागरिकांचाच मोठ्या प्रमाणावर समावेश दिसून आला.याचा अर्थ स्थानिक नागरिक ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकत नसल्याने लसीकरणापासून वंचित राहत आहेत.पक्ष पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र शासनाचे ऑनलाईन नोंदणीचे धोरण निषेधार्ह आहे.स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून स्थानिक आरोग्य प्रशासनाने स्थानिकांसाठी स्वतंत्र लसीकरण यंत्रणा अथवा स्वतंत्र कोटा आरक्षित ठेवावा अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचे निवेदन शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार पाटील यांना देण्यात आले. शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,तुकाराम खोले,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात,उपप्रमुख सुरेश गाडेकर,माजी शहर प्रमुख सुनील परदेशी,संतोष पवार,शुभम माळी,राष्ट्रवादीचे सागर नरवडे आदी यावेळी उपस्थित होते.
शिरूरच्या लसीकरण केंद्रावर शहरातील नागरिकांबरोबरच परदेशी नागरिकही दिसून आले आहेत.ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अवगत नसल्याने तसेच ऑनलाइन प्रक्रियेमधील अडचणीमुळे स्थानिक नागरिक मात्र लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.