धारीवाल यांच्या निधीतून शिरूरमध्ये तीस ऑक्सिजन बेडचे केंद्र सुरू होणार

मोफत ऑक्सिजन सिलेंडर,फॅबिफ्ल्यू टॅबलेट्स व आता 30 ऑक्सिजन बेड साठी निधी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

        शिरूर:कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर तसेच फॅबिफ्ल्यू टॅबलेट्सचा मोफत पुरवठा करणाऱ्या दानशूर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी शहरात ३० ऑक्सिजन बेडचे केंद्र उभारण्यासाठीचा खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे.या सेटअपचा कायमस्वरूपी वापर होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील जागेत हे केंद्र सुरू व्हावे.असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.

           शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, ऑक्सिजनचा तुटवडा पाहून धारिवाल यांनी २३ एप्रिल पासून शहर व पंचक्रोशीतील रुग्णांसाठी        मोफत ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरू केला. यानंतर शहर तसेच पूर्व भागातील मांडवगण व उरळगाव  कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना महागड्या फॅबिफ्ल्यू टॅबलेट्स देण्याचाही स्तुत्य निर्णय घेतला.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाल्यापासून शहरात ऑक्सिजनचा बेड मिळणे दुरापास्त झाले आहे.शिरूर ग्रामीण रुग्णालयात केवळ तीस ऑक्सिजन बेड उपलब्ध असून शहरातील समर्पित कोविड हेल्थ केंद्र व समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये एकूण मिळून साधारण १०० ते सव्वाशे ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत.शहराच्या सीमेवर असणाऱ्या तालुक्यातील गावांमधील रुग्ण या हेल्थ केंद्र व रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याने शहरातील रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यासाठी झगडावे लागत आहे.ही परिस्थिती पाहून व्यथित झालेल्या धारीवाल यांनी तीस ऑक्सिजन बेड असणारे केंद्र सुरू करण्यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे.यासंदर्भात मागील आठवड्यात आमदार अशोक पवार प्रांताधिकारी संतोष देशमुख ज्यांनी मागासवर्गीय मुलींच्या हॉस्टेलची पाहणी केली.धारीवाल यांच्या म्हणण्यानुसार,ऑक्सिजन बेडसाठी उभारला जाणार सेटअप हा कायमस्वरूपी जागेत असायला हवा. जेणेकरून सेटअपचा भविष्यातही इतर रुग्णांना फायदा मिळू शकेल. ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत हा सेटअप उभारला जाऊ शकतो असे मत काही नगरसेवकांनी नोंदवले आहे.
            पाणीपुरवठा समितीचे सभापती, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी याबाबत,ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील जागा यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण रुग्णालयात सध्या तीस ऑक्सिजन बेड आहेत.रुग्णालयाच्या वरील मजल्यावर पाच ते सहा खोल्या असून या जागेमध्ये नवीन ३० ऑक्सिजन बेडचा सेटअप उभारता येऊ शकेल. याठिकाणी हा सेटअप उभारला जावा यासाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार अशोक पवार यांना निवेदन दिले जाणार असल्याचे असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.मागासवर्गीय हॉस्टेल मध्ये अशा प्रकारचा सेटअप उभारल्यास या सेटअप साठी केलेला खर्च भविष्यात वाया जाऊ शकतो.यामुळे हा सेटअप,ज्या ठिकाणी याचा भविष्यातही कायमस्वरूपी वापर होऊ शकेल अशा जागेत उभारला जावा अशी धारीवाल यांना अपेक्षित असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.