प्रकाश धारीवाल यांच्यावतीने प्राणवायू बरोबरच फॅबिफ्ल्यूचाही मोफत पुरवठा

  शिरूर शहर व पूर्व भागातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना दिलासा

0
शिरुरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शहरातील रुग्णांचा ‘प्राण’ वाचवा म्हणून मोफत प्राणवायूची सेवा देणाऱ्या दातृत्व संपन्न उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या वतीने शहर व तालुक्याच्या पूर्व भागातील कोविड केअर सेंटर्स मधील रुग्णांना आवश्यक अशा फॅबिफ्ल्यू  टॅबलेट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.वडगाव रासाई येथे धारीवाल यांच्या हस्ते जिल्हा परिषद प कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्याकडे टॅबलेट्स सुपुर्त करून या सेवेचा श्रीगणेशा करण्यात आला.

         शहरातील रुग्णांसाठी तात्काळ प्राणवायू उपलब्ध करून द्या,लागणारा सर्व खर्च मी देतो.अशी तयारी धारीवाल यांनी प्रांताधिकारी संतोष देशमुख यांच्याशी बोलताना दर्शवली होती.मात्र प्राणवायूच्या कमतरतेमुळे  प्राणवायू उपलब्ध होऊ शकला नाही.ही परिस्थिती पाहून धारीवाल यांनी स्वतः शिरूरच्या रुग्णांसाठी प्राणवायूचे मोफत सिलेंडर देण्याची सेवा सुरू केली. शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे व तुकाराम खोले व त्यांचे सहकारी मित्र सध्या रुग्णांना ही सेवा देत आहेत.आतापर्यंत पन्नासहून अधिक सिलिंडरचा लाभ रुग्णांना मिळाला आहे. जोपर्यंत आवश्यक आहे तोपर्यंत प्राणवायूची ही सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे.प्राणवायू समवेतच आपण आणखी काही सेवा देऊ शकतो का, याची पडताळणी करण्यासाठी धारीवाल यांनी येथील चां.ता. बोरा महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला भेट दिली.सध्या तेथे दिल्या जाणाऱ्या औषधांविषयी माहिती घेतली.याव्यतिरिक्त आणखी कोणते औषध गरजेचे आहे, याबाबत आपल्या डॉक्टर मित्रांशी चर्चा केली.यात फॅबिफ्ल्यू टॅबलेट्स या रुग्णांना आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी धारीवाल यांना सांगितले.एका रुग्णाला चाळीस टॅब्लेटचा डोस आवश्यक आहे.मात्र या डोसची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नाही.यामुळे बोरा महाविद्यालयातील केंद्रासह पूर्व भागातील मांडवगण व उरळगाव येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना या टॅबलेट्स देण्याचा निर्णय धारीवाल यांनी घेतल्याचे शितोळे व खोले यांनी सांगितले.मांडवगण व उरळगाव कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सुजाता पवार यांच्याकडे टॅबलेट्स सुपूर्त करून धारीवाल यांनी या सेवेचा श्रीगणेशा केला.आमदार अशोक पवार,शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार, शितोळे,खोले, सागर पांढरकामे,सागर नरवडे आदी यावेळी उपस्थित होते.
फॅबिफ्ल्यू टॅबलेट्स आमच्याकडे उपलब्ध झाले असून धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरमध्ये आम्ही याचे वाटप करणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.