शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची शिरूरकरांची मागणी

तात्पुरते १०० ऑक्सिजन बेडचे केंद्र उभारण्याचीही मागणी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शहरातील सद्यस्थितीतील आरोग्य उपचार यंत्रणा तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात १०० ऑक्सिजन बेडचे तात्पुरते केंद्र सुरू करावे अशी मागणी शिरूरकरांच्या वतीने विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकाकडे केली आहे सध्या परिस्थिती डॉक्टर.

             शहरातील कोविड-१९ ची सद्य परिस्थिती तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे कसे जायचे याबाबत शहरातील विविध पक्ष,संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर्स तसेच कार्यकर्त्यांची चर्चा केली.या चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले.यानुसार शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा तसेच तात्पुरते ऑक्सीजन बेडचे केंद्र सुरू करावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी  शिरूरवासीयांच्यावतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकाची भेट घेतली.या शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार शहराची अधिकृत लोकसंख्या ४० हजार असून शहरात विविध काम तसेच शिक्षणासाठी श्रीगोंदा पारनेर तसेच उपनगरातून येणाऱ्या लोंढ्यामुळे शहराचे नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.साहजिकच याचा परिणाम सध्याच्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही देखील होत आहे.शहरातील रुग्णवाढीचा आलेख पाहता शहरात उपलब्ध असणारी आरोग्य व्यवस्था अपुरी भासू लागली आहे.यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने आगामी काळात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा प्राप्त होणे,(यामुळे सध्या असलेली तीस बेडची क्षमता ५० होऊ शकणार आहे.)१० व्हेंटिलेटर उपलब्ध होणे तसेच या रुग्णालयाच्या बाजूच्या परिसरात १०० ऑक्सीजन बेडचे तात्पुरते केंद्र उभारणे गरजेचे आहे.हे केंद्र उभारण्यासाठीचा भार उचलण्यासाठी शहरातील सेवाभवी संस्था,उद्योजक तयार असून ते सुरू करण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
          सध्या शहरामध्ये चां.ता  बोरा महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू असून त्या ठिकाणी १५० बेड उपलब्ध आहेत.ही क्षमता वाढवून पाचशे  करावी,शिरूर शहरालगत असणाऱ्या तरडोबाचीवाडी,बाबुराव नगर व शिरूर ग्रामीण (रामलिंग) ग्रामपंचायत आदी परिसरातील नागरिकांसाठी पाच लसीकरण केंद्र सुरू करावे तसेच शिरूर परिसरातील नागरिकांच्या तपासणीसाठी मुबलक तपासणी किट उपलब्ध करावेत आदी मागण्याही शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष नसीम खान,माजी नगरसेवक रवींद्र धनक, शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर,नगरसेवक मंगेश खांडरे,नितीन पाचर्णे, मेडिकल असोसिएशनचे डॉ.सुभाष गवारी,मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबालभाई सौदागर,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,मनसेचे उपजिल्हा प्रमुख मेहबूब सय्यद,सकल जैन समाजाचे संघपती भरत चोरडिया,जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना,बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज सय्यद व अवामी तालीम मरकजचे मोहम्मद हुसेन पटेल आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी शिरूरकरांनी एकजूट दाखवावी असे आवाहन या शिष्टमंडळाच्या वतीने रवींद्र धनक यांनी केले आहे.
या मागण्यांसंदर्भात आमदार अशोक पवार यांचीही शिष्टमंडळ भेट घेणार.

Leave A Reply

Your email address will not be published.