‘अदृश्य’ शक्तीमुळे शिरूरच्या रुग्णांना मिळतोय प्राणवायू

शितोळे व खोले ही मित्रांची जोडगोळी रुग्णांना देत आहे सेवा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:राज्यात अनेक ठिकाणी प्राणवायू अभावी अनेक रुग्णांचे प्राण जात असल्याचे चित्र असताना शिरूरमध्ये मागेल त्या गरजू रुग्णाला प्राणवायू उपलब्ध करून देण्याचे अतिशय मोलाचे काम येथील मित्रांची जोडगोळी करीत आहे.आम्ही काहीच करीत नाही,शहरातील एक अदृष्य शक्ती हे पुण्यकर्म करत असल्याची प्रतिक्रिया या जोडगोळीने ‘शिरूरनामाशी’ बोलताना दिली.

         फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केल्यानंतरही हा प्रादुर्भाव कमी होण्याचे चिन्ह नाही. गेल्या तीन महिन्यातील राज्यातील परिस्थिती पाहता राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे वास्तव आहे.ऑक्सिजन अभावी दररोज कुठे ना कुठे रुग्णांचे प्राण जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे.गेल्या पंधरवड्यात नगरपरिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी शिरूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील व रुग्णांना काय मदत करता येईल पत्रकारांशी चर्चा केली.राज्यात सर्वत्रच ऑक्सिजनची मोठी टंचाई आहे.शिरूर मध्येही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने धारिवाल यांनी त्यावेळी आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोष देशमुख यांच्याशी चर्चा केली.शिरूर मधील जनतेचे प्राण आमच्यासाठी महत्त्वाचे असूून त्यांच्या लागणारा प्राणवायू (ऑक्सिजन) कसल्याही परिस्थितीत उपलब्ध करून देण्याची विनंती प्रांताधिकारी संतोष देशमुख यांच्याकडे केली होती.यासाठी लागणारा खर्च देण्याची तयारीही दर्शवली होती.यानंतर आठ दिवसातच धारिवाल यांचे खंदे समर्थक शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे व तुकाराम खोले यांनी गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली.गेल्या कित्येक दिवसापासून रुग्णांना शहरातील व तालुक्यातील कोविढ आरोग्य केंद्रात मध्ये ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. पुणे नगर सारख्या शहरात जाऊनही ऑक्सिजन बेड मिळण्याची खात्री नाही.यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.अशात शितोळे व खोले यांच्यामुळे अशा हतबल झालेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
         ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होते व त्यांना कुठेच ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही,अशा रुग्णांना शितोळे व खोले ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देत आहेत.ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत असल्याने शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये तसेच स्वतःच्या घरामध्ये रुग्ण ऑक्सिजन लावून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत आहेत.शितोळे व खोले या जोडगोळीच्या या स्तुत्य मोहिमेमुळे आतापर्यंत बारा दिवसात ३५ ते ४० रुग्णांना जीवदान मिळाले आहे. याबाबत ‘शिरूरनामाशी’ बोलताना शितोळे म्हणाले,राज्यात विविध भागात ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी तडफड,होणारे मृत्यू पाहून मन अस्वस्थ झाले होते.ऑक्सिजन अभावी कोणी तडफडू नये कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून आमचे नेते प्रकाश धारिवाल यांची प्रेरणा घेऊन २३ एप्रिल पासून शहरातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू केली.तेव्हापासून अनेक  रुग्णांनी ऑक्सिजन सिलेंडर साठी आमच्याशी संपर्क साधला.अशा प्रत्येक रुग्णाला सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संधी मिळाल्याचे मनस्वी समाधान आहे. आमच्या या मोहिमेला डॉ. संदीप परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे शितोळे यांनी सांगितले.जिथे गरज आहे तिथे त्वरित मदत पोचवण्याचा अदृश्य शक्तीचा आदेश असल्याचे खोले यांनी सांगितले.ऑक्सिजन अभावी शहरातील कोणत्याही रुग्णाला धोका पोहोचू नये हीच आमची प्रामाणिक भावना असून या दृष्टिकोनातून रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची सेवा विनाखंड सुरू राहणार असल्याचे शितोळे व खोले यांनी सांगितले.कोरोनाच्या संकट काळात करीत असलेल्या अमूल्य कार्यास शितोळे यांची सहचारिणी नगरसेविका सुरेखा शितोळे व खोले यांची सहचारिणी संगीता खोले यांची मोलाची साथ मिळत आहे.
अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे याची कल्पना बहुतांशी रुग्णांना असून या शक्तीमुळे प्राणवायू मिळत असल्याने रुग्ण व नातेवाईक या शक्तीचे भरभरून कौतुक करून आशीर्वाद देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.