धूत रुग्णालयाच्या वतीने विशेष मुलींवर औषधोपचार  सुरू

  पाच जणांची वैद्यकीय टीम संस्थेत दाखल

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:अहमदनगर येथील द सॉलव्हेशन आर्मी संस्थेच्या ई धूत रुग्णालयाच्या वतीने आज येथील विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरू करण्यात आले.या संस्थेची पाच जणांची टीम आज सकाळी या संस्थेत दाखल झाली.

        २० एप्रिल रोजी येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेत एक मुलगी कोरोनाबाधित आढळली.२२ एप्रिलला तिचा मृत्यू झाला.यामुळे संस्थेतील सर्व मुली व कर्मचाऱ्यांची ॲटीजेन टेस्ट घेण्यात आली. या टेस्टमध्ये ४८ मुली व ९ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली.या बाधितांवर  औषधोपचार सुरू करण्यात आले.मात्र या ५७ बाधितांना त्यांचे तापमान ऑक्सीजन तपासणे, त्यांना औषध देणे यासाठी संस्थेतीलच केवळ आठच काळजीवाहक महिला सेवा देत होत्या.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी भेट दिल्यानंतर संस्थेत एक डॉक्टर व एक नर्सची व्यवस्था करण्यात आली.विशेष मुलींचे संस्थेतील ही माहिती मिळाल्यावर धूत रुग्णालयाने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून तेथे जाऊन सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार आज एक डॉक्टर,नर्स,लॅब टेक्निशियन व सोशल वर्कर अशा पाच जणांची टीम आज सकाळी संस्थेत दाखल झाली.नियोजनानुसार त्यांनी आज मुलींची तपासणी तसेच औषधोपचार सुरू केले.सॉलव्हेशन आर्मी संस्था या सामाजिक संस्थेच्या वतीने अहमदनगर येथे धूत रुग्णालय चालवले जाते.सध्या या रुग्णालयात १५० कोरोनाचे रुग्ण मोफत उपचार घेत आहेत.
        बूथ रुग्णालयाचा हा सेवाभाव आदर्शवत असा असून सध्याच्या परिस्थितीत विशेष मुलींच्या संस्थेला दिलासा देणारा आहे.विशेष मुलींचा संस्थेतील आठ काळजीवाहक गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित मुली व कर्मचाऱ्यांची सेवा करत आहेत.त्यांना सुरक्षिततेसाठी पी पी ई किट,ऐन-९५,मास्क हात मोजे आदींची आवश्यकता आहे.
५७ रुग्णांना सेवा देण्यासाठी आठ काळजीवाहकांची संख्या अपुरी असून काळजीवाहकांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे.याबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काळजीवाहक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.