शिरूर:येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेला आज जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी भेट दिली. संस्थेतील कोरोनाग्रस्तांची माहिती घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.अहमदनगर येथील धूत रुग्णालयाची पाच जणांची वैद्यकीय टीम संस्थेतील कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या येथे दाखल होणार आहे.
शिररूनामा न्यूज नेटवर्क
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या भेटीनंतर आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरंगटीवर ज्यांनी विशेष मुलींच्या संस्थेला भेट दिली. तेथे त्यांनी कोरोनागस्त मुली तसेच कर्मचाऱ्यांच्या उपचारा संदर्भातली माहिती घेतली.या संस्थेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ असून या रुग्णांना औषध देणे,त्यांचे तापमान तसेच ऑक्सिजन लेवल तपासणे व इतर काम करण्यासाठी केवळ सहा ते सातच काळजीवाहक आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारीच्या सूचनेनुसार एक नर्स ९ ते ५ या वेळात तेथे उपलब्ध करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या रुग्णांसाठी काळजी वाहकांची संख्या कमी असल्याचे कोरंगटीवर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.याबाबत त्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काळजीवाहक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या रुग्णांसाठी प्रॉपर टीम देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.सतहसीलदार लैला शेख, जिल्हापरिषदेच्या वैद्यकीय सोशल वर्कर रोहिणी मोरे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर येथील द साल्वेशन आर्मी संस्थेच्या ई धूत रुग्णालयाने विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधितांच्या उपचार व देखभालीसाठी संस्थेत येण्याची तयारी दर्शविली असून आर्मी संस्थेला यासाठी परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. याबाबत रुग्णालयाचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी सांगितले की,आम्हाला विशेष मुलींचे संस्थेतील मुलींबाबत माहिती मिळाल्यावर आम्ही सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून तेथे जाऊन सेवा देण्याचा निर्णय घेतला.यानुसार एक डॉक्टर,नर्स,लॅब टेक्नीशियन व सोशल वर्कर अशी पाच जणांची टीम त्या संस्थेत उद्यापासून सेवा देणार आहे.आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढी मदत आम्ही करणार आहोत.विशेष मुलींच्या संस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पाटील यांनी सांगितले.या संस्थेतील कोरोनाबाधित मुली व कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.