धरमचंद फुलफगर यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

कोरोना बाधित विशेष मुलींच्या संस्थेला दिला मदतीचा हात

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 

शिरूर: शेकडो रुपयांची नाहक उधळण करत वाढदिवस साजरा करणारे आपण नेहमी पाहतो.मात्र विधायक काम करून आपला वाढदिवस सार्थकी लावणारी मंडळीदेखील समाजामध्ये आहेत.येथील धरमचंद फुलफगर यांनी शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधित मुली व कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

          येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील ४८ मुली व ९ कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.एकाच वेळी संस्थेतील इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित झाल्याने संस्था हवालदिल झाली. संस्थेतील मुलींसाठी भोजनाची व्यवस्था करणारे देखील कोरोना झाल्याने या मुलींसह कर्मचाऱ्यांची भोजनव्यवस्था अडचणीत आली होती.याबाबतची व्यथा संस्थेच्या अधीक्षिका सिस्टर डोमिनी यांनी ‘शिरूरनामाला’ सांगितले असता शिरूरनामाने फुलफगर यांच्याशी संपर्क साधून या मुलींच्या भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. सामाजिक बांधिलकी जपणारे फुलफगर हे सातत्याने उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात..यामुळे फुलफगर यांनी भोजन देण्याची तयारी दाखवली.२९ एप्रिल फुलफगर यांचा वाढदिवस असून ते दरवर्षी आपला वाढदिवस विधायक काम करून साजरा करतात.यंदा कोरोनाच्या वातावरणात आपल्याला असे काही विधायक काम करण्यास मिळेल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र वाढदिवसाच्या दोनच दिवस अगोदर फुलफगर यांना विशेष मुलींना मदत करण्याची संधी मिळाल्याने,यावर्षीही माझा वाढदिवस सार्थकी लागला अशी भावना फुलफगर यांनी व्यक्त केली.फुलफगर यांनी सर्वतोपरी मदत करण्याचची तयारी दर्शवली होती.मात्र शिरूरनामाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील इतरही विधायक काम करणाऱ्या मंडळींनी या संस्थेस मदत करण्याची तयारी दर्शवली.तिलोकरत्न आनंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर की रोटी उपक्रमाच्या सदस्यांनी या संस्थेस बेडशीट भेट दिल्या.भोजन देण्याची तयारीही दर्शवली.उद्योजक मयूर महार यांनी या संस्थेतील कोरोना बधितांची काळजी घेणाऱ्या आठ काळजी वाहकांना सुरक्षितेसाठी पी पी ई किट भेट दिले.शिरूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण आंबेकर व सुखकर्ता मेडिकलचे संचालक चोथमल कोठरी यांनी ऑक्सीमीटर भेट दिले.
आपल्या दातृत्वाची मोहर देशभर उमटवणारे शिरूरवासी रसिकलाल धारीवाल व त्यांच्या दातृत्वाचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे त्यांचे पुत्र प्रकाश धारिवाल यांचे दातृत्व अद्वितीय आहे.नुकतेच धारिवाल यांनी ऑक्सीजन प्लांट उभारणीसाठी ४१ लाख रुपयांची मदत केली. धारीवाल कुटुंबियांचा दातृत्वाचा आदर्श घेत समाजाच्या भल्यासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींची संख्याही शिरूरमध्ये वाढू लागल्याचे समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.