जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार विशेष मुलींच्या उपचारासाठी संस्थेत डॉक्टर आणि नर्स नियुक्त
आमदार अशोक पवार यांचा पुढाकार. संस्थेतील मुली व कर्मचारी यांच्या उपचाराबाबत काळजी घेण्याच्या आमदार पवार यांची सूचना
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार येथील शासकीय विशेष मुलींच्या संस्थेतील कोरोना बाधित मुली व स्टाफसाठी एक डॉक्टर व नर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.आमदार अशोक पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी या संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन सूचना दिल्या.
येथील शासकीय विशेष मुलींचे संस्थेतील ४८ मुली व ९ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले. याबाबत आमदार पवार यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क साधून संस्थेतील परिस्थितीविषयी माहिती दिली व या संस्थेतील बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. आमदार पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याशीही संपर्क साधून उपचाराबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.यावर जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी तातडीने संस्थेत येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.या सर्व ५७ बाधितांना संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.या बाधितांवर ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आले आहेत.या बाधितांना होणारा त्रास, त्यांचे तापमान तपासणे,ऑक्सीजन लेवल तपासणे आदी गोष्टी संस्थेतील काळजी वाहकांना करावे लागत होते. याची दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी एक डॉक्टर एक नर्स या संस्थेत नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनेनुसार आज दुपारी डॉक्टरांनी संस्थे देऊन बाधितांची तपासणी केली.डॉक्टर सकाळी व संध्याकाळी या बाधितांची तपासणी करणार असून नर्स नऊ ते पाच या वेळात तिथे सेवा देणार आहे.
२२ एप्रिलच्या रात्री या संस्थेतील मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. संस्थेच्या अधीक्षिका सिस्टर डोमिनी यांनी या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र या मुलीला बेड मिळू शकला नाही.परिणामी या मुलीचा मृत्यू झाला. काल संस्थेतील दुसऱ्या मुलीला अशाच प्रकारे त्रास होऊ लागल्याने सिस्टर डोमीनी यांनी ‘शिरूरनामाशी’ संपर्क साधला.शिरूरनामाने प्रांताधिकारी संतोष देशमुख यांना याबाबत अवगत केले असता देशमुख यांनी तातडीने या मुलीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी सूचना दिल्या. याची दखल घेण्यात आली व या मुलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान आज सिस्टर डोमिनी यांनाही त्रास सुरू झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.