कोणी रेमडेसिविर देता का?

  गेली तीन दिवसांपासून शिरूर शहर व तालुक्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला

0

शिरूनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: जिल्ह्यातील एकूण कोविड रुग्णसंख्येच्या ४० टक्के रुग्ण एकट्या शिरूर तालुक्यात असताना शहर व

तालुक्यातील कोविड सेंटर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. यामुळे कोविड रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.या सेंटर्सच्या वतीने इंजेक्शनची मागणी करण्यात आलेली आहे मात्र इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरसह रुग्णाचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

           शहर व तालुक्यात कोविड रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र असून सर्व कोविड सेंटर्स रुग्णांनी भरलेली आहेत.रेमडेसिविर इंजेक्शनमुळे रुग्णाच्या जिवाचा धोका कमी होत असल्याने या इंजेक्शनची मागणी वाढू लागली आहे.मात्र गेली तीन दिवसांपासून एकाही कोविड सेंटर्समध्ये रिमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.डॉक्टर्स रेमडेसिविर  इंजेक्शन्स प्रिस्क्राइब करीत आहेत.मात्र रुग्णाच्या नातेवाईकांना कुठेच हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्यांची ससेहोलपट सुरू आहे.अनेक रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पुणे नाशिक येथे जाऊन रेमडेसिविर मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत.श्री गणेशा रुग्णालयाचे डॉ..अखिलेश राजूरकर यांनी सांगितले की, गेली सात दिवसापासून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत.आय सी यु मधील तसेच इतरही रुग्णांना या इंजेक्शनची गरज भासते.शिरूर मध्ये कुठेही ही इंजेक्शन्स मिळत नसल्याकारणाने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली असून त्यांचे हाल होऊ लागले आहेत.काल एका रुग्णाचा मृत्यू झाला या रुग्णाच्या छातीच्या स्कॅनिंग चा स्कोर २४ एवढा होता..रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळाले असतेतर या रुग्णाचा जीव वाचू शकला असता.वेदांता रुग्णालयाचे डॉ.आकाश सोमवंशी यांनी सांगितले की,गेली तीन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाही.या इंजेक्शनची अनेक रुग्णांना आवश्यकता आहे.मात्र इंजेक्शन्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची हतबलता वाढली आहे.ऑक्सिजनचाही तुटवडा भासत आहे.शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे चोथमल कोठारी यांनी सांगितले की, रेमडेसिविरचे दोन स्टॉकिस्ट आहेत.मात्र त्यांच्याकडेही ही इंजेक्शन्स नाहीत.त्यांनी यासाठी ऑर्डर्स नोंदवलेल्या आहेत.मात्र अद्याप इंजेक्शन्स मिळालेली नाहीत.सोमवार पर्यंत इंजेक्शन्स मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
            शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत.हे खरे आहे.वरिष्ठस्तरावर याबाबत आम्ही पत्रव्यवहार केला आहे. शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशन यांनादेखील, ही इंजेक्शन्स त्यांना मिळत नसल्याचे पत्र त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवावे अशी सूचना केली आहे.एकंदरीत परिस्थिती पाहता शिरूर मध्ये रेमडेसिविरचा तुटवडा असून पुढील किमान दोन ते तीन दिवस इंजेक्शन्स मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत ज्या रुग्णांना या इंजेक्शनची गरज भासेल अशा रुग्णांचे नेमके काय होईल ते सांगता येणे कठीण आहे.

 

शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना, रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्याची विनंती करण्यात आल्याचे असोसिएशनचे बाबाजी गलांडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ४०% रुग्ण शिरूर तालुक्यात आहेत.या रुग्णसंख्येचा विचार करून त्या पद्धतीने पुरवठा करावा. अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.