लॉकडाउन कोणालाच परवडणारे नाही-माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील  

माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील यांची मुलाखत

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
प्रवीण गायकवाड
शिरूर:मागील वर्षातील कोरोना कालावधीतील लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता सध्या कोणालाच लॉकडाऊन परवडणारा नाही.मात्र लॉकडाऊन नको असेलतर नागरिकांनी गांभीर्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे आहे.असे मत शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘ दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केले.
          ‘शिरूरनामाला’ दिलेल्या मुलाखतीत खासदार आढळराव पाटील यांनी सर्व प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. लॉकडाऊन बाबत सरकारमधील घटक पक्ष्यांच्या नेत्यांनी वेगवेगळी मतं व्यक्त केलीत. याबाबत विचारले असता आढळराव पाटील म्हणाले, लॉकडाऊन बद्दल सरकारमधील सर्वांचे एकच मत आहे.’निर्बंध पाळा अन्यथा  लॉकडाऊन’ अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही भूमिका मांडलेली आहे.उद्योगपती म्हणून लॉकडाऊनबद्दल आपली काय भूमिका आहे असे विचारले असता, मागील वर्षी सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यात ज्या पद्धतीने लॉकडाऊन करण्यात आले,तशा पद्धतीचे लॉकडाऊन सध्या कोणालाच परवडणार नाही. लॉकडाऊन मुळे लोकांना बँकांचे हफ्ते भरता आले नाही, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्नाची साधने बंद झाली,कारखान्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देता आला नाही, शाळांची फी जमा होऊ शकली नाही,शिक्षकांना पगार मात्र द्यावा लागला.अशा एक ना अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागले आहे. अजूनही सर्व स्थिरस्थावर झालेले नाही.अशात पुन्हा लॉकडाउन जनतेला परवडणार नाही. अशी स्पष्ट भूमिका खासदार आढळराव पाटील यांनी मांडली.कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे व मृत्युदराचे प्रमाण कमी आहे ही सुदैवाची बाब आहे. मात्र तरीही लोकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्याची राजकीय धुळवड पाहता सरकार पाच वर्षे टिकेल का?
माजी वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप तसेच सचिन वाझे प्रकरण यामुळे सरकार कोंडीत सापडले असून सरकारमधील घटक पक्षांमधिल विसंवाद पुढे येऊ लागलाआहे.अशा परिस्थितीत सरकार पाच वर्षे टिकेल का असा प्रश्न केला असता, सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही.सरकार स्थापन झाल्यापासूनच अनेकांच्या मनात सरकार टिकेल का हा प्रश्न आहे.मात्र तीनही पक्षांनी सुसंवाद ठेवल्याने सरकारने दोन वर्ष चांगल्या प्रकारे काम केले असून पुढील तीन वर्ष देखील अशाच प्रकारे काम करेल.सरकारला कसल्याही प्रकारचा धोका नाही.असा दावा आढळराव-पाटील यांनी केला.
कोणाला श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या,”ये पब्लिक है सब जानती है”.
आढळराव पाटील म्हणाले, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प असो वा पुणे नाशिक हायवेचा प्रकल्प असो, या प्रकल्पासाठी गेली सतरा ते अठरा वर्षांपासून जाणीवपूर्वक सातत्याने पाठपुरावा केला.निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही पाठपुरावा सोडला नाही.वारंवार बैठका,२६ फाईलीनंतर अखेर बारा वर्षानंतर माझ्या पाठपुराव्याला यश मिळाले.दोन वर्षापूर्वी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली व त्याचा डीपीआर झाला.हा प्रकल्प आपल्यामुळेच झाला या अविर्भावात नाशिक फाटा पासून नगरपर्यंत फ्लेक्स लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला गेला.१६ हजार कोटी रुपये खर्च असलेले असे मोठे प्रकल्प एका दिवसात मंजुर होत नसतात.यासाठी मोठे योगदान द्यावे लागते.कोणी कितीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ जनतेला हा प्रकल्प कोणामुळे झाला याची पूर्ण कल्पना आहे. खेड सिन्नर या हायवेच्या प्रकल्पासाठी २००७ पासून मी पाठपुरावा करीत आहे. २०१४ ‘ला हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र मध्यंतरी दोन वर्ष सरकारी कंपनी बंद पडली व त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले. निवडणुकीत मला याचा फटका बसला.मात्र पराभूत झाल्यानंतरही मी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करीत राहिलो.अखेर काम पूर्णत्वास आले.केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी,’आढळराव पाटील यांनी नाशिक हायवे व बाह्यवळण मार्गाच्या कामांची मागणी केली व सातत्याने या कामांचा पाठपुरावा केला.त्यानुसार ही कामे मार्गी लावण्यात आली’.असा स्पष्ट उल्लेख लोकसभेत केला होता.या कामाचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला.श्रेय कोणाला घ्यायचे ते घ्यावे,”ये पब्लिक है सब जानती है”असा टोला आढळराव-पाटील यांनी लगावला.
शिरुर नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार आहात का?
शिरुर नगरपरिषद स्वबळावर लढवण्याइतकी शहरात शिवसेनेची ताकद नाही.हे वास्तव आहे.आढळराव पाटील यांनीही हे वास्तव मान्य करताना,स्वबळावर लढताना ताकदीचा अंदाज घेणे गरजेचे आहे.असे स्पष्ट केले.ते म्हणाले, भाजपा शिवसेनेची युती असताना शिरूरमध्ये शिवसेनेचा खासदार होता व भाजपचा आमदार होता.दुर्दैवाने आता खासदारही नाही आणि आमदार देखील नाही. नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे ठरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस काय भूमिका घेते.त्यानुसार शिवसेना निर्णय घेणार आहे.त्यांनी चांगली ऑफर दिल्यास तसेच मानाचे स्थान दिल्यास महाविकासआघाडी सोबत जाऊ. मागील निवडणुकीत शिवसेना प्रकाश धारिवाल यांचे नेतृत्व असणाऱ्या शिरुर शहर विकास आघाडी मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी त्यांना दोन जागा देण्यात आल्या होत्या.यावेळी शिरुर शहर विकास आघाडी मध्ये सहभागी होण्याचा विचार करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, राज्यात आमचे सरकार आहे, आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत शिरुर शहर विकास आघाडीने आम्हाला वाढीव जागा दिल्यास त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू.आढळराव पाटील यांचे वक्तव्य पाहता, शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता धूसर दिसत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेल्यास शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला?
शिरूर लोकसभा मतदारसंघ तयार झाल्यानंतर सलग तीन पंचवार्षिक या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार राहिलेले आहे.या पंधरा वर्षाच्या कालावधीत अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्नांबरोबरच संपूर्ण मतदारसंघात संतुलित विकास झाला आहे.दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा(माझा) पराभव झाला असलातरी मी सातत्याने जनतेच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी रात्रंदिवस उपलब्ध आहे. माझ्या मतदारसंघातील जनतेशी माझे एक अतूट नातं असून त्यांच्यासाठी मी एक हक्काचं नाणं आहे. नुकतीच शिरूर लोकसभा व जिल्ह्यातील विकास कामे व महत्त्वाच्या प्रलंबित कामाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीत शिरूर खेड हवेली मधील रस्त्यांसाठी पीएमआरडीए च्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी रुपयांची मागणी केली.गावोगावी ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामविकास खात्यातून पंचवीस पंधरा निधीची मागणीदेखील केली आहे. यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला सुरेश गोरे आमदार असताना त्यांनी खेड पंचायत समितीची नवीन इमारत मंजूर करून घेतली.विद्यमान आमदाराने यास विरोध करून हे काम रद्द केले व नवीन टेंडर काढून नवीन जागी इमारत बांधण्याचा प्रस्ताव केला. जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादीचे सत्ता आहे.यामुळे बहुमताच्या जोरावर त्यांनी इमारतीची जागा बदलण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविला.यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आम्ही हरकत घेतली.यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ देखील उपस्थित होते.त्यांनीही सुरेश गोरे यांचे काम खंडित होता कामा नये असे नमूद केले.तर  सुरेश गोरे यांनी मंजूर केलेले काम बंद होता कामा नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.यामुळे बंद पडलेले काम लवकरच सुरू होणार आहे.गेल्या पंधरा वर्षापासून जुन्नर तालुक्यातील आदिवासी सहकारी औद्योगिक हिरडा प्रक्रिया उद्योग सुरू होत नव्हता. दीड वर्षापासून यासाठी पाठपुरावा केल्याने आदिवासीमंत्री के. सी. पाडवी यांनी यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले.मात्र आम्हाला न विचारता हा निधी दिलाच कसा असा राग आळवत जुन्नर मधील पुढाऱ्यांनी आदिवासी मंत्र्यांकडे हरकत घेतली.यामुळे काम थांबले होते.ही बाबही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आली.हा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे.जुन्नरमध्ये पुरातत्व विभागाचे पाच हजार वर्ष जुने कुकडेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारने पाच कोटी रुपये मंजूर केल्याचे आढळराव यांनी  सांगितले.जिल्ह्यात पक्षाचा खासदार तसेच आमदारही नाही.यामुळे अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्र्याचे कानावर घातले असता,’माझे तुमच्यावर पूर्ण लक्ष व विश्वास आहे. पक्ष वाढवायची जबाबदारी तुमची आहे’.असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.एकंदरीत माझ्या कामाचा आवाका व मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेला विश्वास पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडी जरी झाली तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळणार, मुख्यमंत्री नक्कीच मला संधी देतील असा विश्वास त्यांनी दर्शवला.

Leave A Reply

Your email address will not be published.