थकबाकीदार असल्याने दादापाटील फराटे व सुधीर फराटे यांच्यासह चौघे सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र
विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था यांचे आदेश
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सदस्य दादा पाटील फराटे यांच्यासह चौघांना संस्थेचे व बँकाचे थकबाकीदार असल्याकारणाने पुढील पाच वर्ष सहकारी संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी हा निकाल दिल्याची माहिती महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फराटे व शितोळे यांनी २०१८ मध्ये,मांडवगण फराटा विविध कार्यकारी संस्थेचे सदस्य दादापाटील फराटे ,सुधीर फराटे हे शरद सहकारी बँक तसेच कल्याण जनता सहकारी बँकेचे तर शहाजी फराटे,तुकाराम थोरात हे मांडवगण फराटा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे थकबाकीदार असल्याने या चौघांना अपात्र ठरवावे असा अर्ज सहाय्यक निबंधक, शिरूर यांच्याकडे दाखल केला होता. थकबाकीदार असल्याबाबतचे पुरावेही सादर करण्यात आले होते. याप्रकरणी सहाय्यक निबंधक यांनी ४ मार्च २०१८ रोजी उपरोक्त चौघे थकबाकीदार नाहीत.त्यांना बँकेने थकबाकीची नोटीस दिली नाही तसेच वसुलीची कारवाई देखील केली नाही. या कारणास्तव फराटे व शितोळे यांचा अर्ज फेटाळून लावला.८ मे २०१८ ला सहाय्यक निबंधकाच्या या निकालाविरुद्ध फराटे व शितोळे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले.याप्रकरणी २४ फेबु.२०२१ ला अंतिम सुनावणी घेण्यात आली.याप्रकरणी ४ मार्च २०२१ ला निकाल देण्यात आला. यात विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी दादा पाटील फराटे, सुधीर फराटे,शहाजी फराटे,तुकाराम थोरात हे थकबाकीदार असल्याचे स्पष्ट होत असल्याने ते कोणत्याही सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून नेमणूक केली जाण्यास,उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तसेच स्वीकृत होण्यास अपात्र ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अर्जदार फराटे व शितोळे यांनी सहाय्यक निबंधकाकडे अर्ज दाखल केला.त्या कालावधीत प्रतिवादी हे थकबाकीदार होते.तरीही सहाय्यक निबंधक यांनी एकतर्फी निकाल दिला असे निकालात म्हटले आहे.
दरम्यान सुधीर फराटे यांनी हा निकाल अमान्य करताना आपल्याला या निकालाबद्दल कसलीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले.विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून आपल्याला कसल्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही.अधिकाऱ्यांना हाताशी धरून घेतला गेलेला हा निकाल आहे असा आरोपही फराटे यांनी केला.या निकालाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपाचे तालुका अध्यक्ष असलेले दादा पाटील फराटे व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असलेले सुधीर फराटे यांनी काल(१५) आमदार अशोक पवार यांचे कारखान्याचे संचालकपद धोक्यात आल्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.यानंतर आज दोन्ही फराटेंच्या निवडणूक लढण्याच्या अपात्रतेबाबतच्या निकालाविषयी पत्रकार परिषद घेण्यात आली. यामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे आहे.