भाविकांअभावी रामलिंग महाराज मंदिर परिसर सुना

महाशिवरात्र असूनही रामलिंगाचे दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड  

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 

शिरूर:दर महाशिवरात्रीला हजारो भाविकांच्या गर्दीने फुलत असलेला रामलिंग महाराज मंदिर परिसर आज भाविकांना अभावी सूना पडल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामलिंग महाराज यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याने आज मंदिर बंद ठेवण्यात आले. भाविकांना मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

         दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त रामलिंग येथे मोठी यात्रा भरते.शहर व पंचक्रोशी चे आराध्य दैवत असलेल्या रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.या यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, शीतपेय यापासून ते लहान मुलांच्या खेळण्यांपर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स लागलेले असतात. रामलिंगाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांमुळे अवघा परिसर रामलिंगमय झाल्याचे दिसून येते.रामलिंगावर असलेल्या अपार श्रद्धेमुळे भाविकांच्या दृष्टीने महाशिवरात्रीचा हा दिवस भारावलेला असतो.तर हा एक दिवस छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी दिवसभरात होणाऱ्या उलाढालीच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांचा प्रचंड हिरमोड झाला.आज महाशिवरात्र असूनही भाविकांना रामलिंगाच्या दर्शनाची संधी न मिळाल्याने भाविकांमध्ये रुखरुख दिसून आली.व्यवसायाची संधी न मिळाल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्येही निराशेचे वातावरण दिसून आले.
            महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी शहरातून मोठ्या उत्साहाने रामलिंग महाराज पालखी मिरवणूक काढण्यात येते. पालखी मिरवणुकीचा हा सोहळा हा अगदी नयनरम्य असतो. ‘शंकर मेरे कब होगे दर्शन तेरे’या गीतापासून ते ‘झिंग झिंग झिंगाट’ त्या गाण्यापर्यंत विविध सुमधुर गीतांचे सादरीकरण करून या मिरवणुकीत  रंग भरणारी नामांकित बँड पथकं या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असतात.या पथकांच्या सुमधुर गीतांबरोबरच रामलिंग महाराजांचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर, झांज पथकांचा  दणदणाट व सहभागी झालेल्या हजारो भाविकांमुळे मिरवणूक सोहळ्यात एक वेगळीच रंगत निर्माण झाल्याचे दिसून येते.कोरोनामुळे यावर्षी ही रंगत पहावयास मिळाली नाही.याची निश्चितच भाविकांना खंत असणार. पालखी मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आल्याने आज पहाटे पावणेतीन वाजता शिवसेवा मंडळ येथे  रामलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते रामलिंग महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छोट्याशा टेम्पोमधून पालखीचे रामलिंग कडे प्रस्थान करण्यात आले. मंदिरात साडेतीन वाजता महारुद्राअभिषेक करण्यात आला. रामलिंग ट्रस्टचे सरचिटणीस तु.म.परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे, विश्वस्त वाल्मीकराव कुरुंदळे, नामदेवराव घावटे, गोदाजी घावटे, रावसाहेबपाटील घावटे, बलदेवसिंग परदेशी, सल्लागार कारभारी झंजाड, जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.