‘सखी कक्ष’ जागतिक महिलादिनी महिलांना मिळालेली अनोखी भेट-सुजाता पवार

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचा उपक्रम

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:पंचायत समितीमध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला ‘सखी कक्ष'(वुमन्स फ्रेंडली रूम) हा महिलांच्या भावनांचा एक प्रकारे आदर असून जागतिक महिलादिना निमित्त त्यांना मिळालेली अनोखी भेट आहे असे मत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सखी कक्ष स्थापन करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शिरूर पंचायत समितीमध्ये जागतिक महिलादिनी, कृषी व संवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांच्या हस्ते सखी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पवार बोलत होत्या.पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे उपसभापती सविता पऱ्हाड, गटविकास अधिकारी विजय नलावडे,बालविकास प्रकल्प अधिकारी रेशा रेडकर,निर्मला चोबे, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता बेंगाळ, सर्व पर्यवेक्षिका व महिला कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने पुणे येथे मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात १२५ महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी या महिलांनी मांडलेल्या समस्यांच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘सखी कक्ष’ स्थापन याचा निर्णय घेण्यात आला. मासिक धर्म कालावधीत त्रास होत असल्यास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती,वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता आदी बाबींसाठी हा कक्ष उभारण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी स्तनपान देण्यासाठी देखील या कक्षाचा वापर करता येणार आहे. सर्व सुविधांनी युक्त असा हा कक्ष असणार आहे. या कक्षात अल्प दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध केले जाणार असून वेंडींग मशीनही बसविली जाणार आहे. तसेच प्रथम उपचार पेटी,सर्वसाधारण लागणारे औषधे देखील उपलब्ध केली जाणार आहेत. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना दिलेली ही अनोखी भेट आहे.असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.