सत्य काही असले तरी प्रदीप कंद यांची कृती अयोग्यच

नेत्यांनी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घालण्यात आलेले निर्बंध,जमावबंदी आदेश असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने  वडगाव रासाई येथे या आदेशाला हरताळ फासून केलेली कृती अयोग्य आहे असेच म्हणावे लागेल.कारण नेतेच जर बेजबाबदार वागले तर सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार.
          नोव्हेंबर नंतर जानेवारीपर्यंत राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा मास्क लावणे सुरक्षित अंतर पाळणे आधी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या आदेशाबरोबरच अनेक निर्बंध लागू केले.२४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंच निवडीच्या दिवशी गर्दी होऊ नये व यातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केले होते.आमदार अशोक पवार यांचे गाव असलेल्या वडगाव रासाई येथे सरपंच निवडीच्या दिवशी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कंद यांनी तेथे हजेरी लावली.निवड झाल्यानंतर जो जल्लोष करण्यात आला. त्यात कंद हे सहभागी झाल्याचे दिसून आले.याची दखल घेऊन पोलिसांनी कंद,नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार यांच्यासह स्थानिकांवर जमावबंदी तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा या नुसार गुन्हा दाखल केला.कंद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले.याचे कारण म्हणजे वडगाव रासाई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार पवार यांच्या समर्थक पॅनलचा पराभव झाला होता.पवार यांच्या विरोधातील पॅनलचा सरपंच निवडला गेल्याने पवार यांचे राजकीय स्पर्धक असलेल्या कंद यांनी या निवडीवेळी आवर्जून हजेरी लावली.यामुळे हा चर्चेचा विषय झाला.
           जल्लोषात सहभागी झाल्याने पोलिसांनी कंद यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र पवार यांनी राजकीय द्वेषापोटी आपल्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले असा आरोप कंद यांनी पत्रकार परिषदेत केला. याला आमदार पवार यांनी प्रत्युत्तर देताना आपला याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.आमदार पवार व कंद यांनी एकमेकावर केलेले आरोप प्रत्यारोप  पाहता हा राजकारणाचा भाग झाला.यात कोण खरं कोण खोटं हा भाग महत्वाचा नसून कोरोनाच्या सध्याच्या कालावधीत जबाबदार नेत्यांनी जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या कंद यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने जल्लोषात सामील होताना सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचा विचार करणे गरजेचे होते.निर्बंध हे जसे सर्वसामान्यांना लागू आहेत तसेच ते नेत्यांनाही लागू असतात.याची जाणीव कदाचित कंद यांना नसावी.

Leave A Reply

Your email address will not be published.