शिरूरनामा न्यूज नेटवर्क
चिमुकल्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?
शिरूर: पुणे-नगर रस्त्यावर अपघातात मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलाच्या मृत्यूस नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारू लागले असून वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर या मुला बरोबरच वर्षभरात दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप शिरूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी केला आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर काल(२) इंदिरा गांधी पुतळ्याजवळ टँकरच्या चाकाखाली आल्याने नऊ वर्ष वयाच्या आयुष दादाभाऊ जाधव या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.आयुष हा आपल्या वडिलांसमवेत शालेय साहित्य आणण्यासाठी येथे आला होता. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारची धडक बसली यात दुचाकीवर मागील बाजूला बसलेला आयुष्य खाली पडला.यादरम्यान मागून येणाऱ्या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली सापडल्याने आयुष गंभीर जखमी झाला.त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.वर्षभरापूर्वी इंदिरा गांधी पुतळ्याजवळच एका टँकरच्या चाकाखाली सापडून एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले होते. या दोन्हीही घटनांवेळी वाहतूक पोलीस या रस्त्यावर हजर नव्हता.
कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार,शिरूर हे विदर्भ मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर दररोज साधारण अडीचशे एसटी बसेसची वाहतूक होत असते. तसेच शिरूर हे श्रीगोंदा पारनेर अशा तीन तालुक्यांची बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. वाहतूक कोंडीची समस्याही कायमचीच आहे.असे असताना या रस्त्यावर वाहतूक पोलिस अभावानेच दिसतात.परिणामी वाहतूककोंडी व यातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील विविध पक्ष संस्था संघटना यांचे पदाधिकारी सातत्याने वाहतूक कोंडी ची समस्या कायमची सुटली जावी यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही हेच वेळोवेळी दिसून आले आहे. याची परिणीती वर्षभरात दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. मात्र तरीही या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक अव्याहतपणे सुरूच आहे. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरात जड वाहनांच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जड वाहनांना या रस्त्यावर वाहतूक करण्यास प्रतिबंध केला असता तर कदाचित अपघात टळले असते. जड वाहनांना या रस्त्यावर वाहतुकीस बंदी करावी तसेच या रस्त्यावर कायम वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी वेळोवेळी केली मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आतातरी पोलिसांनी या मागण्यांकडे लक्ष द्यावे.अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.