शिरूरनामा न्यूजनेटवर्क
शिरूर :गरीब व अल्पमध्यमवर्गीय रुग्णांसाठी गामीण रुग्णालयातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राप्रमाणे आणखी कोविड केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण रुग्णालयातील केंद्रामुळे गरीब व अल्पमध्यमवर्गीय कोविड रुग्णांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.मात्र मर्यादित बेडमुळे अजूनही अशा रुग्णांची परवड होतानाचे चित्र आहे.
जुलै महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली.रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाने शहर व तालुक्यातील चार खासगी रूग्णालये अधिग्रहित करून तेथे समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरू केली. सुरुवातीला रुग्णांचा उपचाराचा खर्च शासन देईल असे सांगण्यात आले.मात्र आठवडाभरातच या रुग्णालयांना रुग्णांकडूनच उपचाराचे बिल घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. या रुग्णालयांनी बिले घेण्यास सुरुवात केल्याने गरीब व अल्पमध्यमवर्गीय रुग्णांची परवड होऊ लागली. याबाबत शिरूरनामाने वाचा फोडल्यावर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी या रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यासाठी अर्ज करण्याच्या सुचना दिल्या. मात्र या योजनेतून मिळणारा मोबदला परवडणारा नाही अशी कैफियत रुग्णालयांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडली.यामुळे गरीब व अल्पमध्यमवर्गीय कोविड रुग्णांच्या मोफत उपचाराचा प्रश्न तसाच राहिला.दरम्यान या रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी पुढे येत होती.आयएमएने देखिल अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे करताना सर्व सदस्य तेथे सेवा देऊ असे आश्वासित केले होते.
यानंतर रांजणगांव एमआयडीसी येथे आयोजित बैठकीत कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अशोक पवार यांच्यासमोर ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्याविषयी विषय घेण्यात आल्यावर पाटील यांनी त्वरीत हे केंद्र सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.यानुसार दहा दिवसांपूर्वी हे केंद्र सुरू झाले.ऑाक्सिजन यंत्रणा उपलब्ध असलेले तीस बेडचे हे केंद्र असून सध्या २६ रुग्ण या केंद्रात उपचार घेत आहेत.या केंद्रात पुर्णतः मोफत उपचार केले जात आहेत.यामुळे काही अंशी का होईना गरीब रुग्णांना याचा फायदा झाला आहे.शहर व तालुक्यातील कोविड रुग्णांची सध्याची परिस्थिती पाहता शहरात २३४ तर तालुक्यात १५२४ कोविडचे रुग्ण आहेत. आतापर्यंत ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दररोज कोविड रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.अशात मोफत उपचार करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्राप्रमाणे आणखी केंद्र सुरु करावी लागणार आहेत.अशाप्रकारे आणखी शंभर बेडचे केंद्र उभारल्यास गरीब व अल्पमध्यमवर्गीय कोविड रूग्णांना निश्चित फायदा होईल.
शिरूर ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्रात फक्त गरीब रुग्णांनाच दाखल करावे.असे काही नाही. यामुळे पैसे वाचावेत म्हणून आर्थिक सक्षम रुग्णही या केंद्रात पाहावयास मिळतात. वास्ताविक ज्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचे बिल परवडणार नाही.त्यांना प्राधान्य मिळणे गरजेचे वाटते. यासाठी ज्यांची उपचाराचा खर्च करण्याची क्षमता आहे.त्यांनी बेड अडवता कामा नये. अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.