शिरूरमध्ये गरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे अवघड

    फूले योजनेतंर्गत मिळणारे मानधन परवडणारे नसल्याचे रूग्णालयांचे म्हणणे

0

शिरूरनामा न्यूजनेटवर्क

शिरूर: .महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मानधन परवडणारे नसल्याचे कोविड सेंटर्ससाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांचे म्हणणे असल्याने सद्या तरी गरीब कोविड रुग्णांना या योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणे अवघड आहे.या रुग्णालयांनी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडेे ही कैफियत मांडली असून शासनाच्या मानधनात काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहेे.

          शहरातील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल,श्रीगणेशा, वेदांता व विघ्नहर्ता या रुग्णांलयांमध्ये समर्पित कोविड आरोग्य सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.या रग्णालयांमध्ये शासनाची कोणतीही योजना लागू नसल्याने गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळू शकणार नाहीत.सुरुवातीला कोविड रुग्णाच्या उपचाराचा खर्च जिल्हा परिषद देणार असे  सुचित करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या  योजनेला मुदतवाढ न मिळाल्याने जिल्हा परिषद रुग्णाचा उपचार खर्च देऊ शकणार नाही असे रूग्णालयांना कळविण्यात आले.यामुळे रुग्णालय प्रशासन व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात उपचाराच्या बिलावरून वाद होऊ लागले.अनेकांनी बिल देण्याचे नाकारले.यामुळे त्रस्त झालेली रुग्णालये रुग्ण दाखल करताना प्रथम डिपॉझिट मागू लागली.परिणामी गरीब रुग्णांची हेळसांड होऊ लागली.याबाबतचे वृत्त शिरूरनामाने प्रसिद्ध केले होते.
           गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी या रुग्णालयांनी फुले जनआरोग्य योजनेसाठी अर्ज करावेत अशा सुचना देण्यासाठी प्रांताधिकारी देशमुख यांनी या रुग्णालयांच्या डॉक्टरांसमवेत बैठक घेतली. या योजनेतून प्रतिरुग्ण मिळणारे मानधन व होणारा खर्च पाहता ही योजना परवडणारी नसल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. या मानधनात  मेडिसिनचाही खर्च निघत नसल्याचे डॉक्टरांचे  म्हणणे आहे.यातच सद्याच्या कोविडच्या परिस्थितीत काम करण्यासाठी पॅरामेडिकल स्टाफ दुप्पट, तिप्पट पगाराची मागणी करीत आहेत.अशा अवस्धेत या मानधनावर काम करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रांताधिकाऱ्यांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतले व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्याचे सुतोवाच केलेे यामुळे तुर्त तरी या रुग्णालयांमध्ये फुले योजना लागू होणार नाही हे स्पष्ट असून यामुळे गरीब कोविड रूणांना मोफत उपचार मिळणे अवघड दिसत आहे.
           शहरात मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल अथवा ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोविड सेंटर करावे.त्या ठिकाणी शहरातील दिडशे डॉक्टर्स सेवा देऊ.असा प्रस्तावही यावेळी या रूग्णालयांनी  प्रांताधिकारी देशमुख यांच्यापुढे मांडला.याबाबतही विचार करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी देशमुख यांनी दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.