शासन व रुग्णालये यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शिरूरमधिल रुग्णांची हेळसांड
शासनाच्या योजनेअभावी खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भरावे लागणार बिल
शिरूरनामा न्यूजनेटवर्क
प्रविण गायकवाड
शिरूर: शासन, प्रशासन व शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची हेळसांड होतानाचे चित्र आहे. यामुळे स्थानिक प्रशासनही हवालदिल झाले असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याच्या आदेशाप्रमाणे शहरात मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल, वेदांता,विघ्नहर्ता व श्रीगणेशा या रुग्णालयांमध्ये समर्पित कोविड आरोग्य सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.सर्वात प्रथम येथील धारीवाल रुग्णालयात सतरा जुलैपासून कोविड सेंटर सुरू करण्यात आले.यानंतर इतर तीन रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.सुरुवातीला
खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बिल जिल्हा परिषद देणार असे रुग्णालय प्रशासनाला तोंडी सांगण्यात आले. याबाबत कसलेही लेखी पत्र त्यांना देण्यात आले नाही.तरीही सतरा जुलैपासून शहरातील कोविड सेंटरमध्ये रूग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली.शासन बिल अदा करणार याबाबत स्पष्टता नसल्याने रुग्णालयाचे प्रशासन संभ्रमित होते.रुग्णालय प्रशासनाने सांगीतल्यानुसार,अनेक रूग्णांचे त्यांना बिल मिळाले नाही.नऊ दिवसानंतर अचानक काल ( २५जुलै ) एका रुग्णालयाच्या प्रशासनाला रुग्णांकडूनच बिल घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.यानुसार आता रुग्णांना उपचाराचे बिल द्यावे लागणार आहे.प्रशासनाच्या या सुचनेमुळे आर्थिक दूर्बल रुग्णांची मात्र आता परवड होणार आहे.रुग्णाची आर्थिक परिस्थीती चांगली नसेल तर त्या रूग्णाला उपचार मिळणे कठीण होऊन बसले आहे.अशा रुग्णांचा शासनाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
शासनाने आर्थिक दूर्बल घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत रुग्णाला मोफत उपचाराची सुविधा मिळते. शहरातील एकाच रुग्णालयात ही योजना लागू आहे.या योजनेसाठी रुग्णालयांनी शासनाकडे अर्ज करावा लागतो.दूर्देवाने बहुतांशी रुग्णालयांनी यासाठी अर्जच न केल्याने सद्याच्या परिस्थीतीत गरजूंना मोफत उपचाराचा लाभ घेता येत नाही.जिल्हा परिषदेच्या योजनेचाही रुग्णांना लाभ मिळणार नाही.यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.आजची परिस्थीती पाहता धारीवाल रूग्णालयात कोवीडचे आठ तर वेदांतामध्ये दहा रुग्ण दाखल आहेत.गेल्या दहा दिवसांत शहरातील एकाच कोविड सेंटरमध्ये तीन कोविड रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात दररोज एका तरी नविन रुग्णाची भर पडत आहे.अशात या रुग्णांना बेड मिळणे,आवश्यकता भासल्यास व्हेण्टिलेटरची सुविधा मिळणे गरजेचे आहे. शहरातील रुग्णालयांतील परिस्थीती पाहता एकूण दहाच व्हेण्टिलेटर्स आहेत.अशात व्हेण्टिलेटर्सची गरज भासणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्यास अवघड परिस्थीती निर्माण होऊ शकेल. शासनाने याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
शासनाने शहरात चार ठिकाणी कोवीड सेंटर्स सुरू केलीत.मात्र या सेंटर्सना पॅरामेडिकल स्टाफची समस्या सतावत असल्याचे सुत्रांनी सांगीतले.कोविड सेंटर्स सुरू केल्याने नर्सेस तसेच इतर स्टाफ पळून गेल्याचे चित्र आहे. याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा यात रुग्णांचीच हेळसांड होणार आहे.
शासनाने कोविड व नॉनकोविड या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची काळजी घेतली पाहिजे असे म्हटले आहे. मात्र आयसीयू तसेच इतर वॉर्ड कोविडच्या रुग्णांनी व्यापलयावर ह्रदयविकार, किडनी अथवा गंभीर प्रकारचे आजार असणाऱ्या रूग्णांनी जायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील एका सेंटर्समध्ये कोविड व्यतिरिक्त दुसरा रुग्ण घेतला जात नाही. इतरही सेंटरने असे रुग्ण घेण्यास नाकारल्यास अशा रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागेल….. ‘याबाबत शासन काय भुमिका घेते हे पाहावे लागेल.
|
|
|